(मुंबई)
बीसीसीआयने देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला क्रिकेटपटूंना नववर्षापूर्वी दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपेक्स कौन्सिलच्या बैठकीत महिला क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी वाढ करण्यास मंजुरी देण्यात आली. दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वनडे वर्ल्ड कप जिंकल्यानंतर, आता देशांतर्गत पातळीवरील खेळाडूंचे आर्थिक स्थैर्य मजबूत करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.
याआधी किती मानधन मिळत होते?
आतापर्यंत देशांतर्गत स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन मर्यादित होते. वरिष्ठ गटातील अंतिम ११ खेळाडूंना दिवसाला २० हजार रुपये, तर राखीव खेळाडूंना १० हजार रुपये मिळत होते. ज्युनिअर गटातील अंतिम ११ खेळाडूंना १० हजार रुपये, तर राखीव खेळाडूंना केवळ ५ हजार रुपये दिले जात होते. टी-२० सामन्यांमधील मानधन याहूनही कमी होते.
नवी वेतन रचना काय आहे?
बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या वेतन संरचनेनुसार महिला क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे.
– वरिष्ठ महिला (अंतिम ११): ₹२०,००० वरून थेट ₹५०,०००
– वरिष्ठ महिला (राखीव): ₹१०,००० वरून ₹२५,०००
– टी-२० सामने (अंतिम ११): आता ₹२५,००० प्रति दिवस
– ज्युनिअर महिला (अंतिम ११): ₹१०,००० वरून ₹२५,०००
या निर्णयामुळे देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या महिला खेळाडूंना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
पंच आणि मॅच रेफरींच्या मानधनातही वाढ
बीसीसीआयने केवळ खेळाडूंच्याच नव्हे तर पंच आणि मॅच रेफरींच्या मानधनातही वाढ केली आहे. देशांतर्गत लीग सामन्यांसाठी पंच आणि मॅच रेफरींना आता दिवसाला ४० हजार रुपये मिळणार आहेत. बाद फेरीच्या सामन्यांसाठी हे मानधन वाढवून दिवसाला ५० ते ६० हजार रुपये करण्यात आले आहे.
बीसीसीआयच्या या निर्णयामुळे महिला क्रिकेटमध्ये व्यावसायिकता वाढेल, तसेच ग्रामीण आणि निमशहरी भागातील अनेक मुलींना क्रिकेटकडे करिअर म्हणून पाहण्याची प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

