(संगमेश्वर/ प्रतिनिधी)
पाली भाषा आणि धम्मलिपीच्या अध्ययनातून भगवान बुद्धांच्या मूळ उपदेशाचा सखोल अभ्यास करण्याबरोबरच प्राचीन बौद्ध साहित्य आणि वारशाची ओळख नव्या पिढीला करून देण्याच्या उद्देशाने चाफवली येथे पाली भाषा व धम्मलिपी प्रशिक्षण वर्ग उत्साहात पार पडला.
भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा रत्नागिरीच्या पाली विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या पाली भाषा व धम्मलिपी अभियानांतर्गत २५ सप्टेंबर रोजी भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा, चाफवली येथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी, उपासक आणि उपासिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी पाली भाषा व धम्मलिपीचे अभ्यासक प्रा. दिलीप वामनराव वासनिक, अभ्यासक विजय जाधव, अनामिका जाधव, संजय आयरे तसेच दीपिका वासनिक यांची प्रमुख उपस्थिती होती.
मार्गदर्शन करताना प्रा. दिलीप वामनराव वासनिक यांनी बौद्ध साहित्यामधील पाली भाषेचे महत्त्व, तिचा ऐतिहासिक प्रवास तसेच पाली भाषा शिकण्यामागील उद्देश याविषयी सविस्तर विवेचन केले. पाली भाषेच्या अध्ययनामुळे भगवान बुद्धांच्या मूळ शिकवणीचा अधिक सखोल अभ्यास करता येतो, असे त्यांनी सांगितले. तसेच पाली भाषेत स्वतःचा परिचय कसा करून द्यावा, याचेही त्यांनी प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले.
अभ्यासक विजय जाधव यांनी सम्राट अशोकाच्या काळातील धम्मलिपीची ओळख विद्यार्थ्यांना करून देताना फळ्यावर प्रत्यक्ष लेखन करून दाखविले. त्यामुळे उपस्थितांना धम्मलिपी समजून घेण्याबरोबरच ती प्रत्यक्ष लिहिण्याचा अनुभव मिळाला. कार्यक्रमास विजय कांबळे, अशोक जाधव, दीपक कांबळे, चंद्रकांत कांबळे, सुबोध कांबळे, सुगंध कांबळे, दिपाली कांबळे यांच्यासह चाफवली परिसरातील विद्यार्थी, उपासक व उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
पाली भाषा आणि धम्मलिपीच्या माध्यमातून बौद्ध साहित्य, बुद्धांचा धम्म आणि प्राचीन बौद्ध वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला. ‘पाली भाषा शिकूया, धम्मलिपी जाणून घेऊया आणि बुद्धांच्या धम्माचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवूया,’ असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनामिका जाधव यांनी केले. दीपक कांबळे यांनी आभार मानले. सरणत्तय ग्रहण करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.


