(संगमेश्वर /प्रतिनिधी)
तालुक्यातील निवे बुद्रुक येथील अक्षय विनायक राजवाडे (एम.एस्सी. भौतिकशास्त्र) यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आर्थिक उन्नतीचा प्रेरणादायी प्रवास सुरू केला आहे. शैक्षणिक पात्रता असूनही त्यांनी शेतीला केवळ उपजीविकेचे साधन न मानता, ती उत्पन्न वाढीचा आणि व्यावसायिक संधी निर्माण करणारा क्षेत्र बनविण्यात यश मिळवले आहे.
अक्षय राजवाडे यांनी आपल्या शिक्षणादरम्यान शेतीविषयक सखोल माहिती आत्मसात केली आणि एम.एस्सी. पूर्ण केल्यानंतर चार वर्षे विविध शैक्षणिक संस्थांमध्ये भौतिकशास्त्र शिक्षक म्हणून कार्य केले. शिक्षण आणि अनुभवाचा लाभ घेत, त्यांनी पारंपरिक शेतीत आधुनिक तंत्रांचा समावेश केला आणि विविध भाजीपाला पिकांचा व्यवसाय सुरू केला. सध्या त्यांच्या शेतात पालेभाजी, मुळा, पालक, बीट, मेथी, वांगी, हिरवा मटार, टोमॅटो यासारखी पिके लागवड केली आहेत. प्रत्येक पिकासाठी योग्य काळजी, सिंचन पद्धती, खत व्यवस्थापन आणि उत्पादन वाढीसाठी विज्ञानाच्या तत्त्वांचा अवलंब केला जात आहे. यामुळे उत्पादनात वाढ झाली असून बाजारपेठेत विक्री करून आर्थिक स्थैर्यही मिळू लागले आहे.
अक्षय राजवाडेंच्या यशामागे जिद्द, मेहनत आणि सातत्य हे मुख्य घटक आहेत. त्यांनी स्थानिक कृषी सहाय्यक रवींद्र यादव यांचे मार्गदर्शन घेऊन आधुनिक शेतीचे तंत्र शिकले आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग केला. अक्षय यांचे असे म्हणणे आहे की, “फक्त मेहनत आणि कृषिविषयक योग्य माहिती असली तर शेतीतूनही चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकते.” त्यांच्या प्रयत्नांनी फक्त स्वतःसाठीच नव्हे, तर परिसरातील इतर शेतकर्यांसाठीही मार्गदर्शक ठरले आहे. तरुण पिढीसाठी आधुनिक शेतीतून उत्पन्न वाढविण्याचे प्रेरणास्थान म्हणून अक्षय राजवाडे उदाहरण ठरत आहेत.
अक्षय यांचा हा अनुभव दाखवतो की, शिक्षण आणि विज्ञानाच्या तत्त्वांचा वापर करून पारंपरिक शेतीला व्यावसायिक स्वरूप देणे शक्य आहे. हे उदाहरण ग्रामीण भागातील तरुणांना नवीन मार्गदर्शन देत आहे, ज्यामुळे त्यांनी कृषी व्यवसायाला केवळ उपजीविकेपुरते मर्यादित न ठेवता, त्यातून आर्थिक स्थैर्य आणि व्यवसायिक यश मिळवता येऊ शकते.

