(राजापूर / तुषार पाचलकर)
राजापूर तालुक्याच्या प्रशासनिक सुविधा वाढवण्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची मागणी विधानभवनात पुढे आली आहे. पावसाळी अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात ‘अप्पर तहसील कार्यालय’ सुरू करण्याची मागणी केली आहे.
राजापूर तालुका मोठ्या भूभागावर विस्तारलेला असून, अनेक दुर्गम गावांमुळे नागरिकांना तहसील कार्यालयाच्या सेवांसाठी लांबचा प्रवास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर अप्पर तहसील कार्यालय उभारल्यास प्रशासन अधिक कार्यक्षम होईल आणि सामान्य जनतेला सोयीच्या सेवा मिळतील, असा मुद्दा श्री. खोत यांनी अधिवेशनात मांडला.
ते म्हणाले, “राजापूरमधील जनतेला शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी अप्पर तहसील कार्यालयाची नितांत आवश्यकता आहे. ही मागणी लवकरच मान्य होऊन निर्णय घेतला जावा अशी अपेक्षा आहे.” या मागणीमुळे स्थानिक जनतेमध्ये उत्सुकता असून, शासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.