(राजापूर/ रत्नागिरी प्रतिनिधी)
राजापूर नगर परिषदेच्या काँग्रेसच्या नगरसेविका आफरोज महमद झारी यांचे इतर मागास प्रवर्ग (न्हावी) जातीचे जातप्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविल्यानंतर जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांचे नगरसेविका पदाचे सदस्यत्व रद्द झाल्याचे जाहीर केले आहे. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले असून त्याची प्रत संबंधित नगरसेविकेलाही बजावण्यात आली आहे. या निर्णयामुळे राजापूर नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ६ ‘अ’मधील नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) आरक्षित जागा रिक्त झाली आहे.
जिल्हाधिकारी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे की, जात पडताळणी समितीने जातप्रमाणपत्र अवैध ठरविलेल्या आदेशाच्या दिनांकापासून आफरोज झारी यांचे नगर परिषद सदस्यत्व समाप्त झाले असून संबंधित जागा रिक्त घोषित करण्यात येत आहे. या प्रकरणाची प्रक्रिया राजापूर नगर परिषदेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानंतर पुढे सरकली. २०२५ मधील नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ ‘अ’ मधून नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) या आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या झारी यांचे जातप्रमाणपत्र जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले होते. त्यानंतर समितीने हा निर्णय उपविभागीय अधिकारी आणि राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना कळविला. मुख्याधिकाऱ्यांनी त्याबाबतचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांकडे सादर केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश जारी केला. या आदेशामुळे आफरोज झारी यांना यापुढे नगर परिषदेच्या सभागृहातील कामकाज, बैठका किंवा निर्णयप्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
दरम्यान, या निर्णयाचे राजकीय पडसादही उमटण्याची चिन्हे आहेत. नगर परिषद सभागृहात महाविकास आघाडीचे संख्याबळ एका सदस्याने कमी झाले आहे. सध्या महाविकास आघाडीकडे काँग्रेसचे सहा आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तीन असे नऊ सदस्य असून लोकनियुक्त नगराध्यक्षपदही त्यांच्या ताब्यात आहे. दुसरीकडे महायुतीकडे शिवसेनेचे नऊ आणि भाजपचा एक असे दहा सदस्य आहेत. मात्र नगराध्यक्षांना असलेल्या विशेष मतदानाधिकारामुळे सभागृहातील महाविकास आघाडीचे प्रभावी बहुमत कायम राहण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक ६ ‘अ’मध्ये पोटनिवडणुकीची शक्यता
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रभाग क्रमांक ६ ‘अ’मधील जागा अधिकृतपणे रिक्त झाल्याने तेथे लवकरच पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे राजापूरच्या राजकीय वर्तुळात संभाव्य उमेदवार आणि आगामी निवडणुकीच्या समीकरणांबाबत चर्चांना वेग आला आहे. दरम्यान, जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरोधात आफरोज झारी न्यायालयात दाद मागणार का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

