(नवी दिल्ली)
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) कडून २०२५-२६ या वर्षासाठीचे वार्षिक परीक्षा कॅलेंडर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांनी SSC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन हे सविस्तर वेळापत्रक पाहावे. या कॅलेंडरमध्ये २०२५-२६ या कालावधीत घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षांची माहिती दिली आहे.
या नव्या वार्षिक कॅलेंडरमध्ये CGL (कॉम्बाइन्ड ग्रॅज्युएट लेव्हल), CHSL (कॉम्बाइन्ड हायअर सेकंडरी लेव्हल), MTS (मल्टी टास्किंग स्टाफ), JE (ज्युनिअर इंजिनिअर), सिलेक्शन पोस्ट्स, दिल्ली पोलीस आणि CAPF (केंद्रीय सशस्त्र पोलिस दल) मधील सब-इन्स्पेक्टर, स्टेनोग्राफर आणि GD कॉन्स्टेबल अशा विविध पदांचा समावेश आहे.
दरवर्षी देशभरातून सुमारे २० लाखांहून अधिक उमेदवार SSC च्या विविध परीक्षांसाठी अर्ज करतात. हे उमेदवार १०वी, १२वी किंवा पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून सरकारी नोकरीच्या शोधात असतात. याच पार्श्वभूमीवर, उमेदवारांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता यावे यासाठी SSC दरवर्षी अगोदरच परीक्षा कॅलेंडर प्रकाशित करते. SSC च्या या कॅलेंडरमध्ये CGL, CHSL, CPO, सिलेक्शन पोस्ट, स्टेनोग्राफर, JE आणि MTS अशा प्रमुख परीक्षांच्या तंतोतंत तारखाही नमूद करण्यात आल्या आहेत. आयोगाने जाहीर केलेल्या प्राथमिक वेळापत्रकानुसार, उमेदवारांनी त्यांचा अभ्यासक्रम नियोजनपूर्वक पूर्ण करण्याची तयारी ठेवावी. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या संख्येनुसार काही परीक्षा एकाच दिवसाऐवजी एकाहून अधिक दिवसांमध्ये घेतल्या जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.