(पालघर)
नालासोपारा पूर्वेतील महेश पार्क परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका बंद फ्लॅटमध्ये सोमवारी दुपारी ३० वर्षीय तरुण हिरेन महेंद्र चित्तौडा याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेनंतर परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महेश पार्कमधील ‘शिवम निवास’ इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक ३०९ मध्ये हिरेन चित्तौडा राहत होता. या बंद खोलीतून तीव्र दुर्गंधी येऊ लागल्याने परिसरातील रहिवाशांना संशय आला. त्यांनी तात्काळ हिरेनची बहीण आणि स्थानिक समाजसेवक स्वप्निल बांदेकर यांना या घटनेची माहिती दिली. स्थानिक समाजसेवक आणि नातेवाईक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी तुलिंज पोलिसांना तातडीने पाचारण केले.
पोलिसांनी दरवाजा तोडून केला प्रवेश
घटनास्थळी दाखल झाल्यावर पोलिसांना घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. बराच वेळ हाक मारूनही प्रतिसाद न मिळाल्याने पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात प्रवेश करताच पोलिसांना धक्का बसला; हिरेनचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडला होता. त्याचा मृत्यू एक/दोन दिवसांपूर्वी झाला असावा, अशी चर्चा घटनास्थळी होती.
मृत्यूमागील कारणांचा तपास
हिरेन चित्तौडा आपल्या आईसोबत राहत होता, मात्र काही दिवसांपूर्वीच त्याची आई गुजरातमधील मूळ गावी गेली होती. त्यामुळे हिरेन एकटाच घरात होता. मिळालेल्या माहितीनुसार, हिरेन गेल्या काही दिवसांपासून आजारी होता आणि त्याला नशेचे व्यसन असल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे मृत्यूमागे आजारपण आहे की अन्य काही कारण, याचा सध्या पोलिस तपास सुरू आहे.
तुलिंज पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. हिरेनचा मृत्यू कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल. सध्या पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास आणि चौकशी सुरू आहे.

