(कोल्हापूर)
उचगाव परिसरात बुधवारी सायंकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. पतंग उडवण्याचा निखळ आनंद एका कुटुंबावर काळ बनून आला. विद्युत तारेत अडकलेला पतंग काढण्याच्या प्रयत्नात दोन सख्ख्या भावांना विजेचा मोठा धक्का बसला. यात मोठा भाऊ सार्थक नीलेश वळकुंजे (वय 16) याचा मृत्यू झाला असून, धाकटा भाऊ कार्तिक (वय 14) गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना उचगाव येथील मंगेश्वर मंदिराच्या मागे बाबानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर, बुधवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास घडली. पतंग उडवताना त्यांचा पतंग उच्चदाबाच्या विद्युत तारेत अडकला. तो खाली आणण्यासाठी सार्थक आणि कार्तिक यांनी जवळील बंगल्याच्या गच्चीवर जाऊन प्रयत्न सुरू केला. हातात असलेल्या दहा एमएमच्या लोखंडी सळीचे टोक तारेला लागल्याने विजेचा प्रचंड झटका बसला.
धक्क्याने सार्थक जागीच बेशुद्ध झाला, तर कार्तिक खाली फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत दोघांना सीपीआर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सार्थकला मृत घोषित केले. कार्तिकची प्रकृती गंभीर असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
या घटनेची नोंद गांधीनगर पोलिस ठाण्यात झाली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
मृत सार्थक हा उचगाव येथील न्यू माध्यमिक हायस्कूलमध्ये दहावीचा विद्यार्थी होता. त्याचे वडील मेंढपाळ असून आई गृहिणी आहे. या अपघाताने वळकुंजे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
घटनेनंतर संपूर्ण उचगाव गाव शोकमग्न झाले असून, शाळेतील शिक्षक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी सार्थकला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना इशारा दिला आहे की, विद्युत तारेजवळ पतंग उडवणे, तारेला हात लावणे, अडकलेली वस्तू काढण्याचा प्रयत्न करणे जीवघेणे ठरू शकते.

