(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गावरील कापसाळ येथे चिपळूण पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा मोठी कारवाई करत गुटखा वाहतूक करणारी बोलेरो पिकअप गाडी आणि तब्बल २३ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी एक आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.
गुटख्याची किंमत १६.९४ लाख रुपये असून, त्यासोबत ७ लाख रुपये किंमतीची बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.
विश्वसनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गुटखा चिपळुणात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर चिपळूण पोलीस सतर्क झाले. त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंगे यांच्या नेतृत्वात एक पथक तयार करण्यात आले.
या पथकात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पो. हवालदार वृषाल शेटकर, पो. हवालदार संदीप मानके, पो. नाईक रोशन पवार यांचा समावेश होता. पथकाने कापसाळ येथे सापळा रचत संशयित बोलेरो गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर गुटखा आढळून आला.
या कारवाईमुळे अवैध गुटखा वाहतुकीला मोठा धक्का बसला आहे. स्थानिक पोलिसांची तत्परता व नियोजनबद्ध कारवाई यामुळे हा प्रकार उघडकीस आला.

