(चिपळूण)
महावितरण कंपनीच्या वहाळफाटा (ता. चिपळूण) येथील मोकळ्या जागेत ठेवलेले तब्बल ७५ लाख रुपयांचे ४५० लोखंडी इलेक्ट्रीक पोल चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. ६ जून) सायंकाळी ५ ते रात्री १२ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी तीन ट्रेलर चालकांसह चौघांविरोधात सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेने चिपळूण तालुक्यात खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी ट्रेलर चालक सुरेश खारोल (रा. राजस्थान), दोन अनोळखी ट्रेलर चालक आणि साहील मलिक (ज्याने पोल कंपनीच्या संमतीशिवाय घेऊन जाण्याचे निर्देश दिले) अशी चौघांची नावे संशयित म्हणून नमूद आहेत. फिर्याद अखिलेश कुमार लालताप्रसाद प्रजापती (वय ४७, रा. मूळ विरार, पालघर; सध्या रा. भरणेनाका, ता. खेड) यांनी पोलिसात दिली आहे.
महावितरणच्या सावर्डे सबस्टेशनजवळील मोकळ्या जागेत सचिन वारे यांच्या जमिनीवर हे पोल ठेवण्यात आले होते. मात्र, संबंधित आरोपींनी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता ट्रेलरच्या साहाय्याने हे पोल चोरून नेले. चोरीला गेलेल्या साहित्यामध्ये 1) १० मीटर लांबीचे १५२/१५२ साईजचे ४४ पोल – १०,६१,३४९ , 2) १३ मीटर लांबीचे १५२/१५२ साईजचे २७ पोल – ८,०६,७२७ , 3) १० मीटर लांबीचे १००/११६ साईजचे ३७९ पोल – ५६,१६,०२२ या सर्वांचा एकूण अंदाजे किंमत ७४,८४,०९८ इतकी आहे. घटनेनंतर सावर्डे पोलीस ठाण्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.