(चिपळूण)
श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या कीर्तनमालेच्या जानेवारी २०२६ मधील दहाव्या वर्षाच्या कीर्तनमालेच्या तयारीचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. आयोजक परिवाराचे श्रद्धास्थान असलेले सद्गुरू निवास तसेच शहरातील आराध्य दैवतांना निमंत्रण देऊन या तयारीस प्रारंभ करण्यात आला.
गेल्या नऊ वर्षांपासून चिपळूण आणि कीर्तनमाला हे समीकरण दृढ झाले असून, नेटके नियोजन व दर्जेदार सादरीकरणामुळे रसिकांच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारी ही कीर्तनमाला यंदा दहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. सोमवार, दि. १२ जानेवारी ते शुक्रवार, दि. १६ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित या पाच दिवसीय कीर्तनमालेचा विषय ‘पेशवाईचा सुवर्णकाळ’ असा आहे.
ही कीर्तनमाला चिपळूण शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र येथे दररोज सायंकाळी ६.३० ते रात्री ९.३० या वेळेत होणार आहे. कीर्तनमालेचे उद्घाटन सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता संत साहित्याचे गाढे अभ्यासक श्री. धनंजय चितळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
या कीर्तनमालेचे मुख्य आकर्षण म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार, विद्यावाचस्पती ह.भ.प. चारूदत्त आफळे यांचे अभ्यासपूर्ण विवेचन आणि त्यांच्या अमोघ वाणीला लाभलेली सुश्राव्य संगीताची साथ. विषयाला साजेसे रंगमंच नेपथ्य, अनुरूप वातावरणनिर्मिती आणि विनामूल्य प्रवेश ही या कीर्तनमालेची वैशिष्ट्ये असून, त्यामुळे ही कीर्तनमाला गेली नऊ वर्षे रसिकांसाठी पर्वणी ठरत आली आहे.
परमपूज्य श्री गुरूमाऊली सद्गुरू वासुदेव दळवीकाका महाराज यांच्या आशीर्वादाने आयोजित या कीर्तनमालेत, गेल्या तीन वर्षांत शिवचरित्र, छत्रपती शंभूराजे, छत्रपती राजाराम महाराज, ताराराणी, शाहू महाराज, बाळाजी विश्वनाथ पेशवे व बाजीराव पेशवे यांच्या शौर्यगाथा उलगडण्यात आल्या. यंदाच्या कीर्तनमालेत मराठेशाहीतील पेशवाईच्या सुवर्णकाळाचा ऐतिहासिक मागोवा रसिकांना अनुभवता येणार आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कीर्तनमालेसाठी विनामूल्य प्रवेश असून, आसन व्यवस्थेतील पहिल्या काही रांगा विशेष अतिथी व आयोजक परिवारासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राची जागा मर्यादित असल्याने, रसिकांनी वेळेत उपस्थित राहून विनामूल्य आसन व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी चैतन्य परिवारातर्फे करण्यात आले आहे.

