(लांजा)
लांजा बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी एसटी बसची धडक बसून एक वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात वृद्धाचे दोन्ही पाय गंभीर जखमी झाले असून, त्यांची हालचाल अशक्य झाली आहे.
अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली. जखमी वृद्धाला तात्काळ लांजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटना बसस्थानकाच्या अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे.
बसस्थानक परिसरातील वाहतुकीचा विस्कळीत कारभार आणि अपुरी सुरक्षाव्यवस्था यामुळे अशा प्रकारचे अपघात घडत असल्याची टीका स्थानिकांकडून करण्यात येत आहे. या अपघाताबाबत लांजा पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे.