(मुंबई)
येत्या शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी राज्यभरात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने हे मोठे पाऊल उचलले असून, मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आता पारंपरिक विषयांव्यतिरिक्त इतर चार महत्वाच्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन विषयांचा समावेश – श्रेणी पद्धतीने मूल्यांकन
नव्या अभ्यासक्रमात आता शारीरिक शिक्षण (PT), कार्यानुभव, कला आणि आरोग्य शिक्षण हे विषयही शिकवले जाणार असून, याचे मूल्यांकन गुणाऐवजी श्रेणी पद्धतीने होणार आहे. यापूर्वी फक्त भाषा, गणित व परिसर अभ्यास हेच विषय होते, परंतु नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांचे केवळ बौद्धिक नव्हे, तर शारीरिक, सृजनशील आणि सामाजिक कौशल्यही विकसित होणे गरजेचे मानले जात आहे.
एनसीईआरटीचा पुढाकार – राज्यभर प्रशिक्षण सुरू
राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (NCERT) ने इयत्ता पहिलीसाठी नवीन अभ्यासक्रम तयार केला असून, त्यानुसार अध्यापन कसे करावे, याचे प्रशिक्षण राज्यातील शिक्षकांना दिले जाणार आहे. राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक श्री. राहुल रेखावार यांच्या सूचनेनुसार, १ जून 2025 पासून राज्यभरात शिक्षकांचे प्रशिक्षण सुरू होईल.
काय बदलणार नव्या अभ्यासक्रमात?
- विद्यार्थ्यांच्या केवळ अभ्यासक्रम आधारित प्रगतीऐवजी, त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर
- मूल्यांकनात श्रेणी (Grade-Based Assessment) – ‘A’, ‘B’, ‘C’ स्वरूपात
- मुलांच्या सृजनशीलता, आरोग्य जाणीव, कार्यदक्षता आणि शारीरिक सक्रियतेला प्रोत्साहन
- अध्यापनात अनुभवात्मक आणि आनंददायी पद्धतींचा वापर
पालकांसाठी महत्त्वाची माहिती:
हा अभ्यासक्रम केवळ शिक्षणपद्धतीत बदल घडवणार नसून, मुलांच्या व्यक्तिमत्व विकासालाही दिशा देणारा ठरणार आहे. त्यामुळे पालकांनीही या बदलांची माहिती घेत, शाळेतील उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.

