(चिपळूण)
कोकण रेल्वेमार्गावरील स्लीपर कोचमध्ये काही प्रवासी दिवसा झोपण्यासाठी इतर प्रवाशांवर दादागिरी करत असल्याच्या तक्रारी वाढत असून, यावर कडक कारवाई करण्याची मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
रेल्वेच्या नियमानुसार, स्लीपर कोचमधील प्रवासी रात्री १० वाजेपासून सकाळी ६ वाजेपर्यंतच आपली सीट झोपण्यासाठी वापरू शकतात. मात्र, दिवसाच्या वेळी सर्व प्रवाशांनी एकत्र बसावे, अशी व्यवस्था आहे. तरीही काही प्रवासी ‘‘तिकीट झोपण्यासाठीच काढले आहे,’’ असे सांगत दिवसा सुद्धा झोपण्याचा अडमठपणा करतात. त्यामुळे इतर प्रवाशांना बसण्यास, जेवण्यास तसेच प्रवास सुसह्य करण्यास अडचणी येत आहेत.
शौकतभाई मुकादम यांनी सांगितले की, अशा प्रकारचे प्रकार वारंवार घडत असून काही प्रवासी टीसी व आरपीएफकडे तक्रार करत असले तरी त्याची दखल घेतली जात नाही. यामुळे प्रवाशांमध्ये वाद निर्माण होत आहेत. विशेषतः कोकणाच्या बाहेरून येणारे काही प्रवासी दादागिरी करत असल्याचे निदर्शनास आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“रेल्वे प्रशासनाने त्वरित याकडे लक्ष द्यावे आणि स्लीपर कोचमधील प्रवासी नियमबाह्य वागणूक करत असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई करावी. टीसी आणि आरपीएफने समन्वयाने काम करून अशा प्रवाशांना वठणीवर आणावे,” अशी ठाम मागणी मुकादम यांनी केली आहे.