(खेड)
शहरातील पाथरजाई मंदिराशेजारील अर्णव इंटरप्रायजेसच्या दुकानदाराला रविवारी (२२) रोजी सुमारे ४:३० वाजण्याच्या सुमारास १५ ते २० महिला व पुरुषांच्या जमावाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी मारहाण झालेले किरण संजय तायडे (३७, रा. वेरळ-खोपी फाटा ता. खेड, जि. रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आताउल्ला तिसेकर व १५ ते २० अज्ञात महिला-पुरुषांवर येथील पोलिस स्थानकात अँट्रॉसिटीसह अनेक कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.
किरण तायडे हे रविवारी नेहमीप्रमाणे सकाळी १० वाजता दुकानात शटर बंद करून आत काम करत बसले होते. सायंकाळी ४:१५ वाजता ते नाश्ता करण्यासाठी दुकानातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांना दोन वर्षांपूर्वी त्यांच्या दुकानात कामाला असलेली एक महिला भेटली. तिने तिच्या पॅनकार्डमध्ये केवायसी होत नसल्याचे सांगितले. दुकानात ते काम करत असताना ४:३० वाजण्याच्या सुमारास आताउल्ला तिसेकर दुकानामध्ये आला आणि हे काय चालले आहे, अशी विचारणा केली. आपण काम करत असल्याचे सांगत असतानाच तिसेकर याने आपल्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला व मारहाण केली. थोड्याच वेळाने तेथे मुस्लीम समाजाची १५ ते २० पुरुष व महिला गोळा झाले. त्यानंतर ते सर्वजण दुकानात शिरले व दुकानाची तोडफोड केली. आताउल्ला तिसेकर याने शिवीगाळ करून धमकीही दिली.
दरम्यान, तायडे यांची पत्नी व आई घटनास्थळी आल्या. त्यावेळी जमावातील काही लोकांनी त्यांनाही धक्काबुक्की केली. या प्रकरणी पोलिसांनी आताउल्ला तिसेकर व १५ ते २० अज्ञात महिला-पुरुषांवर भारतीय न्याय संहिता कलम ११५ (२), ३३३, ३५१ (२), ३५२, ३२४(२), १८९ (२), १९०, अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ चे कलम ३ (२) (va), ३(१) (r), महाराष्ट्र पोलिस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) व १३५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.