(संगमेश्वर / प्रतिनिधी)
महाड तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीच्या जठरामध्ये अडकलेली टाचणीसारखी टोकदार पिन बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण, सावर्डे येथे एंडोस्कोपीच्या माध्यमातून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी यांनी ही उपचारप्रक्रिया केली. मोठी शस्त्रक्रिया न करता पिन काढण्यात आल्याने तरुणीला दिलासा मिळाला.
महाड तालुक्यातील एका खेडेगावात राहणाऱ्या या तरुणीने खेळताना तोंडात एक टोकदार पिन धरली होती. त्याचवेळी अचानक ही पिन तिच्या घशातून आत गेली. घाबरलेल्या तरुणीने तातडीने ही बाब आई-वडिलांना सांगितली. त्यानंतर त्यांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे एक्स-रे तपासणी केली असता पिन जठरामध्ये असल्याचे आढळून आले. पुढील उपचारांसाठी मुंबई किंवा पुणे येथे जाण्याचा सल्ला तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, या उपचारांचा खर्च परवडणारा नसल्याने तरुणीच्या वडिलांनी तिला बी. के. एल. वालावलकर रुग्णालय, डेरवण येथे नेले.
या रुग्णालयातील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी यांनी परिस्थितीचा आढावा घेत एंडोस्कोपीद्वारे पिन काढण्याचा निर्णय घेतला. अत्यंत काळजीपूर्वक ही प्रक्रिया पार पाडत कोणतीही मोठी शस्त्रक्रिया न करता पिन बाहेर काढण्यात आली. विशेष म्हणजे, हे उपचार अत्यंत अल्प दरात उपलब्ध झाल्याने कुटुंबाला आर्थिक दिलासाही मिळाला.
पोटात किंवा अन्ननलिकेत अडकलेल्या धारदार वस्तूंमुळे अंतर्गत अवयवांना इजा होण्यासह रक्तस्रावाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अशा वस्तू वेळेत बाहेर काढणे महत्त्वाचे असते. या प्रकरणात तातडीने वैद्यकीय तपासणी आणि योग्य उपचार झाल्याने मोठी शस्त्रक्रिया टाळता आली. डॉ. आनंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाने एंडोस्कोपीद्वारे पिन यशस्वीरित्या काढली.
फोटो : महाड तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीच्या जठरामध्ये अडकलेली टोकदार पिन एंडोस्कोपीद्वारे यशस्वीरित्या काढल्यानंतर डॉ. आनंद जोशी आणि रुग्णालयाचे वैद्यकीय पथक.


