(खेड)
मुंबई-गोवा महामार्गावर खोपी फाटा येथील परिसरात आज सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास दोन मालवाहू ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
चिपळूणहून मुंबईकडे जाणारा आयशर टेम्पो (क्र. MH 46 CL 1072) आणि मुंबईकडून चिपळूणकडे येणारा कंटेनर (क्र. RJ GN 6494) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, टेम्पोमधील चालक रामलखन प्रजापती (वय 40, रा. छत्तीसगड) आणि संजय मेवालाल चौधरी (वय 25, रा. उत्तरप्रदेश) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तत्काळ मदत पोहोचवण्यात आली. भरणे नाका ब्रिजखाली उभ्या असलेल्या श्री जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान, नानिजधाम यांच्या २४ तास मोफत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना कळंबणी बु. येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले. या मदतकार्यात मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनीही सक्रिय सहभाग घेतला.
या अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक मंदावली होती. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास सुरू आहे.

