( राजापूर )
सदैव दरड कोसळण्याच्या धोक्याखाली असलेल्या अणूस्कुरा घाटात आज (सोमवार) एक मध्यम स्वरूपाचा दगड रस्त्यावर येऊन पडल्याची घटना घडली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक ग्रामस्थांनी घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांच्या मदतीने तो दगड तात्काळ हटवला, त्यामुळे घाटातील वाहतूक सुरळीत राहिली.
अणूस्कुरा घाट जरी वाहतुकीसाठी सध्या खुला आणि वापरात असला, तरी दरड कोसळण्याचा धोका सतत अधांतरी असतो. मागील वर्षी घाटात मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून मातीचा ढिगारा रस्त्यावर साचला होता. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत सुरू केली होती.
या घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे की अणूस्कुरा घाटात दरड कोसळण्याचा धोका अद्याप कायम आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला आगामी पावसाळ्यात घाटावर सतत लक्ष ठेवावे लागणार आहे. विशेषतः गेल्या काही महिन्यांपासून कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात अणूस्कुरा घाटमार्गेच सुरू आहे. वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेता पावसाळ्यात घाटमार्ग कसा सुरक्षित व सुरळीत ठेवायचा, ही मोठी जबाबदारी आता सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे.

