(खेड /रत्नागिरी)
पैशांच्या व्यवहारातून निर्माण झालेला वाद थेट घरात घुसून झालेल्या मारहाणीपर्यंत पोहोचल्याची घटना खेड तालुक्यातील चिंचघर-दस्तुरी येथे घडली. या प्रकरणात एका महिलेसह तिच्या पतीला मारहाण करून जखमी करण्यात आल्याचा आरोप असून पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सौ. रश्मी विजय भोजानी (वय ३४) या त्यांच्या पती विजय भोजानी यांच्यासह चिंचघर-दस्तुरी येथील राहत्या घरी असताना रविवारी (२२ जून) सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली. पैशांच्या वादातून कमल विकास पवार, अर्जुन विकास पवार, अक्षय विकास पवार आणि शुभम नलावडे हे चौघेजण त्यांच्या घरी आल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. फिर्यादीनुसार, घरात घुसल्यानंतर आरोपींनी वाद घालत मारहाण करण्यास सुरुवात केली. कमल पवार आणि शुभम नलावडे यांनी हाताने तसेच फावड्याच्या लाकडी दांडक्याने रश्मी भोजानी यांच्या मानेवर व कानाजवळ वार करून त्यांना दुखापत केली. याच वेळी त्यांच्या डोक्यावर दगड फेकून मारण्यात आल्याचा आरोप आहे. झटापटीदरम्यान त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडून त्याचे नुकसान करण्यात आल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, पत्नीला वाचविण्यासाठी धावून आलेले विजय भोजानी यांनाही आरोपींनी लक्ष्य केल्याचा आरोप आहे. अर्जुन पवार आणि अक्षय पवार यांनी त्यांना हाताने, लाकडी दांडक्याने तसेच दगडाने मारहाण करून जखमी केले. यानंतर फिर्यादी दाम्पत्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या घटनेत सौ. रश्मी भोजानी जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून खेड पोलिस ठाण्यात कमल विकास पवार, अर्जुन विकास पवार, अक्षय विकास पवार आणि शुभम नलावडे यांच्याविरोधात गुन्हा क्रमांक १८५/२०२६ दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांसह घरात घुसखोरी, दुखापत, धमकी व मालमत्तेचे नुकसान यासंदर्भातील कलमांन्वये गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

