(देवरुख /सुरेश सप्रे)
महाराष्ट्र शासनाच्या संगमेश्वर तालुका कृषी विभागातील अनेक पदे रिक्त असल्याने ऐन शेती हंगामात शेतकरीवर्गाला शासनाच्या विविध योजनांचा लाभ वेळेत मिळत नसल्याने व लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नसल्याने तालुक्यातील शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त केली जात आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कृषी अधिकारी कार्यालयात अनेक पदे भरली गेली नसल्याने रिक्त आहेत. या कार्यालयातील संगमेश्वर तालुका कृषी अधिकारी पद गेले आठ महिन्यांपासून रिक्त आहे. तालुका कृषी अधिकारी पदासह सहाय्यक कृषी अधिकारी
पर्यवेक्षक दोन पद रिक्त. लिपिक पद चार असून तीन पदे रिक्त.३७ कृषी सहाय्यक पदे आहेत. त्यातील १६ पद रिक्त आहेत.
या कार्यालयातील अनेक पदे रिक्त असल्याने शासनाच्या विविधयोजनांची अंमलबजावणी करताना अतिरिक्त पदभार सोपवलेल्या कर्मचारी वर्गाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाला अनेक लाभापासून वंचित राहावे लागत असून कामकाजाचा बोजवारा उडाला असल्याने चित्र दिसते आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटीबध्द असल्याचा दावा करणाऱ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी ही रिक्त पदे भरली जावीत व सर्व सामान्य शेतकऱ्यांना लाभ व्हावा यासाठी प्रयत्नशील न राहता कानाडोळा करत दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
सर्वपक्षीय लोकप्रतिनिधीही याकडे लक्ष देत नसल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फटका अनेकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .