( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर येथील नवनिर्माण महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने ‘फ्लेवर ऑफ स्ट्रीट’ या अभिनव आणि आकर्षक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, सीमा हेगशेट्ये, डॉ. अलिमिया परकार, उद्योजिका सौ. मनीषा रहाटे, श्रुती कापडी, कपिल शिर्के, प्राचार्या डॉ. प्रज्ञा कदम, डॉ. संजना कदम, अभय गर्दे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. अलिमिया परकार यांनी दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबविणे हे अत्यंत आव्हानात्मक असते, मात्र नवनिर्माण संस्था हे काम सातत्याने व यशस्वीरीत्या करत असल्याचे गौरवोद्गार काढले. कपिल शिर्के यांनी महाविद्यालयातील विविध शैक्षणिक शाखा प्रभावीपणे कार्यरत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. उद्योजिका सौ. मनीषा रहाटे यांनी विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन करताना सांगितले की, “माणसाने कधीही थांबू नये. बदलाची आणि प्रयत्नांची कास धरली पाहिजे. व्यवसायात यश मिळवण्यासाठी धाडस व अनुभव गरजेचा असून तो अनुभव देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य नवनिर्माण संस्था करत आहे.”
श्रुती कापडी यांनी आपल्या भाषणात भिडे वखार ते सुसज्ज इमारत असा नवनिर्माण महाविद्यालयाचा प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले. संगमेश्वर ते परदेश असा यशस्वी प्रवास करणारे गणेश फरसाण, गणेश मोदक तसेच कापडी यांचा मानांकित मँगो पल्प यांसारखे उद्योग आज यशस्वीपणे कार्यरत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मी हे करू शकते, तर तुम्हीही नक्की करू शकता,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळावे, हा नवनिर्माण संस्थेचा ध्यास आज खऱ्या अर्थाने सफल झाल्याचे सांगताना चेअरमन श्री. अभिजित हेगशेट्ये यांनी नवनिर्माणचे विद्यार्थी आज पंचतारांकित हॉटेल्स, एअरलाईन तसेच परदेशातही नोकरी करत असल्याचे नमूद केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्रमुख भिकाजीराव बेहरे, मितेश पवार तसेच प्राध्यापिका कदम यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संतोष खरे यांनी केले.

