(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील खडपोली येथे रविवारी रात्री मुसळधार पावसात मासेमारीसाठी गेलेले तिघे नदीपात्रात अडकल्याची घटना घडली. वेळीच मिळालेल्या माहितीनंतर प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली चिपळूण तालुका प्रशासनाच्या रेस्क्यू टीमने तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या तिघांची सुखरूप सुटका करण्यात आली.
अडकलेल्यांमध्ये संतोष वसंत पवार (४०), त्यांची पत्नी सुरेखा संतोष पवार (३५) आणि पुतण्या ओंकार रवी पवार (१७) (सर्व रा. दळवटणे, राजवाडा) यांचा समावेश होता. हे तिघे मासेमारीसाठी नदीपात्रात गेले असताना अचानक पाण्याची पातळी वाढल्याने ते अडकले. मात्र, नदीपात्रातील एका बेटावर त्यांनी सुरक्षित आसरा घेतला होता.
प्रशासनाच्या या धाडसी कारवाईत महसूल विभाग, पोलीस, नगर परिषद, आरोग्य विभाग, महानिर्मिती व आपदा मित्र सहभागी होते. दोरीच्या सहाय्याने अत्यंत कौशल्याने हे तिघे बाहेर काढण्यात आले. चिपळूण रेस्क्यू टीमने दाखवलेले धाडस आणि तत्परता यामुळे ही कारवाई यशस्वी झाली.