( संगमेश्वर / प्रतिनिधी )
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली सोळा वर्षे सुरू असताना संगमेश्वरच्या नशिबी असणारे या कामाच्या दुर्दैवाचे फेरे संपतासंपत नसल्याचे दुर्दैवी चित्र पाहायला मिळत आहे. एक वेळ हा महामार्ग संगमेश्वरच्या बाहेरून गेला असता, तरी बरे झाले असते असे म्हणण्याची वेळ संगमेश्वर वासियांवर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदार संगमेश्वर वासियांचा अंत पहात असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत संगमेश्वर बस स्थानकासमोर राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि ठेकेदाराने नियमबाह्यपणे एकेरी वाहतूक सुरू करून वाहन चालकांच्या नशिबी गेले दोन महिने वाहतूक कोंडीचा त्रास निर्माण करून ठेवला आहे. संगमेश्वरच्या दुतर्फा दररोज दोन किलोमीटर लांबीच्या वाहनांच्या रांगा लागत असल्याने वाहन चालक आणि प्रवासी कमालीचे संतप्त झाले आहेत.
संगमेश्वर पासून वांद्री कडे जाताना अनेक ठिकाणी कामे अपूर्ण असून कोळंबे गावाच्या जवळ तर ठेकेदाराने अत्यंत बेपर्वाईने काम सुरू ठेवले असल्याने या भागात पावसाचे पाणी साठवून दुचाकी ला अपघात घडत आहेत. कोळंबे गावाजवळ वाहन चालवणे हे अत्यंत धोकादायक बनले असल्याने राष्ट्रीय महामार्ग विभागाने येत्या दोन दिवसात येथील अडचणी दूर न केल्यास याच ठिकाणी रास्ता रोको करण्याचा इशारा कोळंबे येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
संगमेश्वरच्या जवळ पैसा फंड इंग्लिश स्कूल येथे गेले वर्षभर अंडरपासचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून बाजूने काढलेले सर्व्हिस रोडचे उन्हाळ्यात डांबरीकरण न केल्याने या मार्गावर सध्या एक फूटभर खोलीचा आणि संपूर्ण सर्व्हिस रोडवर लांबलचक चिखलाचा पट्टाच तयार झाला आहे. या चिखलात गेल्या चार दिवसात दहा दुचाकीस्वारांना अपघात घडला असून गाडीवरून पडल्यानंतर ते पूर्णपणे चिखलात माखून गेले होते. या रस्त्यावरून दुचाकीच नव्हे तर पादचाऱ्यांना चालणे देखील ठेकेदाराने कठीण करून ठेवले आहे.
डांबरीकरण न केल्यास आंदोलन
पैसा फंड इंग्लिश स्कूलच्या जवळील अंडरपासच्या सर्व्हिस मार्गाचे पाऊस थांबताच तातडीने डांबरीकरण न केल्यास याच ठिकाणी शेकडो प्रवाशांना आणि वाहन चालकांना घेऊन रास्ता रोको आंदोलन हाती घेण्यात येणार आहे. सद्यस्थितीत पाऊस असताना या मार्गावर चिखलापासून बचाव करण्यासाठी तातडीने खडी पसरावी. मुर्दाड बनलेल्या ठेकेदारासह राष्ट्रीय महामार्ग विभागाने संगमेश्वर वासियांसह वाहन चालकांच्या भावानांचा अंत पहायचे ठरवले आहे.
– परशुराम पवार
प्रवासी वाहतूक संघटना पदाधिकारी, संगमेश्वर