(मुंबई)
चिपळूण येथील वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत यादव यांनी पत्नी सौ. स्वप्नाताई यादव यांच्यासह मंगळवारी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे व डॉ. विनय नातू उपस्थित होते.
हजारोंचा पक्षप्रवेश
प्रशांत यादव यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. यात शिक्षक पतपेढीचे माजी अध्यक्ष बळीराम मोरे, राष्ट्रवादीचे माजी युवक जिल्हाध्यक्ष योगेश शिर्के, जि. प. माजी बांधकाम सभापती विजयराव देसाई, माजी जि. प. सदस्य दीप्ती महाडिक, माजी उपसभापती अनंत हरेकर, तसेच विविध माजी पदाधिकारी, उद्योजक, वकील, डॉक्टर, सरपंच आदी मान्यवरांचा समावेश होता.
एकूण ४ माजी जि. प. सदस्य, ६ माजी पं. स. सदस्य, ३ उद्योजक, ३ डॉक्टर, ९ वकील, १७ सरपंच, २४ विविध सेलचे पदाधिकारी व २४ ग्रा. प. सदस्य अशा जवळपास दोन हजार कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
उपस्थित मान्यवर
या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सतीश मोरे, सरचिटणीस विनोद भाई भोबस्कर, माजी नगरसेविका रसिका देवळेकर, माजी नगरसेवक विजय चितळे, माजी शहराध्यक्ष श्रीराम शिंदे, अमोल भोबस्कर आदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

