(संगमेश्वर / एजाज पटेल)
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू असतानाच संगमेश्वर तालुक्यातील कसबा जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे. कसबा जिल्हा परिषद गटात कसबा आणि परचुरी पंचायत समिती असे दोन गण येतात. मात्र यंदा भाजपकडून जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीसाठी एकाही उमेदवाराची घोषणा न झाल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.
तळागाळातील जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेत भाजपचा लोकप्रतिनिधी असावा, अशी मागणी कार्यकर्ते आणि समर्थकांकडून सातत्याने केली जात होती. मात्र उमेदवार न मिळाल्याने भाजप कार्यकर्त्यांची मोठी कोंडी झाली आहे.
या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुका भाजपचे उपतालुका प्रमुख तसेच डिंगणी गावचे उपसरपंच मिथुन निकम यांच्या पत्नी सौ. मधुरा निकम यांनी पुढाकार घेतला आहे. खाडीभागातील जनतेकडून मोठ्या प्रमाणावर आग्रह होत असल्याने त्यांनी पंचायत समिती परचुरी गणातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला असून, २० जानेवारी रोजी त्या अधिकृतपणे अर्ज सादर करणार आहेत.
भाजपकडून अधिकृत उमेदवार जाहीर झाला नसला तरी कार्यकर्त्यांचा आग्रह, जनतेचा विश्वास आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या नेतृत्त्वामुळे मधुरा निकम यांना उत्स्फूर्त पाठिंबा मिळत आहे.
या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना मधुरा निकम म्हणाल्या, “लोकांचा विश्वास आणि प्रेम पाहता मी निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करण्याची माझी ठाम तयारी आहे,” असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, भाजपने उमेदवार न दिल्याने निर्माण झालेल्या राजकीय पोकळीतून अपक्ष उमेदवारीचा नवा पर्याय समोर येत असून, परचुरी गणातील ही निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याचे संकेत मिळत आहेत.

