(देवरुख / सुरेश सप्रे)
देवरूखजवळील साडवली कासारवाडी येथे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास बिबट्या दिसल्याने परिसरात खळबळ उडाली. येथील रहिवासी राजेंद्र धने यांच्या घराच्या मागील बाजूस तो वावरत असल्याची माहिती पोलिस पाटील साडवली यांनी तात्काळ वनविभागाला दिली.
वनविभागाचे पथक आवश्यक साहित्य घेऊन घटनास्थळी दाखल झाले. तपासणीदरम्यान बिबट्या एकाच ठिकाणी बसलेला आढळून आला. त्याला सुरक्षित रित्या ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत तो नर बिबट असून वय अंदाजे तीन ते चार वर्षे असल्याचे समोर आले. त्याच्या मागील डाव्या पायाच्या मांडीला जखम असून, कोल्हापूर वन विभागातील वन्यजीव पशुवैद्यक युवराज शेटे व संतोष वाळवेकर यांनी तत्काळ वैद्यकीय तपासणी करून उपचार केले.
या कारवाईत सहायक वनसंरक्षक रत्नागिरी-चिपळूण प्रियांका लगड, परिक्षेत्र अधिकारी प्रकाश सुतार, जितेंद्र गुजले यांच्यासह रत्नागिरी, लांजा, साखरपा व राजापूर विभागातील वनपाल-वनरक्षक, पोलीस पाटील साडवली आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

ही कार्यवाही विभागीय वन अधिकारी रत्नागिरी-चिपळूण श्रीमती गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वनविभागाच्या टोल-फ्री क्रमांक 1926 किंवा मोबाईल क्रमांक 9421741335 वर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.

