(संगमेश्वर)
तालुक्यातील सरंद येथील रहिवासी, माखजन पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष शशीशेखर रमाकांत भागवत यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते.
शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिलेल्या भागवत सरांनी मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी अत्यंत प्रभावीपणे पार पाडली. त्यांच्या कार्यकाळात संस्थेच्या माध्यमिक शाळेला कनिष्ठ महाविद्यालय जोडण्यात आले. त्यामुळे १९९५ च्या सुमारास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग खुला झाला. संस्थेच्या प्रगतीसाठी त्यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. अध्यक्षपद भूषवल्यानंतरही ते संचालक म्हणून संस्थेच्या विविध कामकाजात सक्रिय सहभागी होते.
शैक्षणिक योगदानासोबतच, शशीशेखर भागवत सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही सक्रिय होते. सरंद ग्रामपंचायतीचे ते उपसरपंच म्हणूनही कार्यरत राहिले. छायाचित्रण हा त्यांचा खास छंद होता. जुन्या काळात मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मुंबईत दूरदर्शनसाठी छायाचित्रकार म्हणून काम केले आणि त्या क्षेत्रातही नावलौकिक मिळवला. भागवत यांची सरंद येथील लक्ष्मीनारायण देवस्थानावर अपार श्रद्धा होती. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेक ग्रामस्थांनी त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने सरंद गावाने एक तळमळीचा कार्यकर्ता, संवेदनशील शिक्षणतज्ज्ञ आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्व गमावले आहे.