(लांजा)
तालुक्यातील धुंदरे सुतारवाडी येथे ३५ वर्षीय तरुणाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. अविनाश हरिश्चंद्र पांचाळ असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव असून, या घटनेमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
रविवारी (दि. ७) रात्री अविनाश पांचाळ शेजारी जेवणासाठी गेले होते. त्यानंतर घरच्यांना “बाहेरून थोडं फिरून येतो” असे सांगून ते घराबाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत ते परत न आल्याने त्यांचा चुलत भाऊ तुषार पांचाळ व काही ग्रामस्थ शोध घेण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी घराच्या मागील बाजूस आंब्याच्या झाडाला अविनाश गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले.
लगेचच त्यांना लांजा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती तुषार पांचाळ यांनी पोलिसांना दिली. सध्या आत्महत्येमागील कारणाचा तपास पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकॉन्स्टेबल राजेंद्र कांबळे करत आहेत. अचानक घडलेल्या या घटनेने धुंदरे सुतारवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

