( खेड )
शहरातील बसस्थानकाजवळील विदर्भ कोकण बँकेत कार्यरत असलेल्या ३२ वर्षीय तरुणीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मृत तरुणीचे नाव सुप्रिया विनायक वनशा (वय ३२, सध्या रा. पाटणे संकुल, कुंभारआळी, खेड; मूळगाव – भाईंदर, जिल्हा ठाणे) असे असून, ती काही महिन्यांपासून कुंभारआळी येथील पाटणे संकुलात भाड्याच्या खोलीत राहात होती.
दरम्यान, बराच वेळ दरवाजाला प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांनी याबाबत खबर दिली. दरवाजा तोडून आत पाहिले असता, तिने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले. यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सखोल तपास सुरू केला आहे.
सुप्रिया हिने आत्महत्या नैराश्यातून केल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. मात्र, तिने आत्महत्या का केली, यामागील नेमके कारण अजून अस्पष्ट आहे. तिच्या खोलीतील कागदपत्रांची व डायरीची झडती घेतली जात असून, कोणतीही लिहून सुसाईड नोट आहे का, याचा तपास सुरू आहे.
पोलीस यंत्रणा या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहत असून, सुप्रिया हिच्या आत्महत्येमागील पार्श्वभूमी शोधण्यासाठी सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे.