( ठाणे )
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, या प्रकरणातील तिन्ही आरोपींना न्यायालयाने 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान या प्रकरणामागे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, आणखी दोन आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. रविवारी (28 जून) तिन्ही आरोपींना भिवंडी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयातील न्यायाधीश एस. एम. सुतार यांच्या सुट्टीच्या न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी तपासासाठी 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 6 जुलैपर्यंत म्हणजेच 8 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली.
आरोपींकडून TET प्रश्नपत्रिका जप्त
पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धीरज बलराज सिंग (हरियाणा), राजीव साव (बिहार) आणि आकाशकुमार स्वराजकुमार (बिहार) यांच्या ताब्यातून TET परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त करण्यात आली आहे. तपासादरम्यान या पेपरफुटीमागे आंतरराज्यीय रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणातील आणखी दोन संशयित आरोपी फरार असल्याचेही पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
कोणकोणत्या मुद्द्यांचा होणार तपास?
पोलिसांकडून पुढील मुद्द्यांवर सखोल तपास केला जाणार आहे.
- प्रश्नपत्रिका आरोपींपर्यंत नेमकी कशी पोहोचली?
- महाराष्ट्रात इतर ठिकाणीही प्रश्नपत्रिकेची विक्री झाली का?
- आर्थिक व्यवहार कोणकोणाशी झाले?
- या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे?
याच कारणास्तव पोलिसांनी न्यायालयाकडे 10 दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती.
आरोपीच्या आरोग्याचा मुद्दा न्यायालयात
दरम्यान, आरोपी धीरज बलराज सिंगच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, त्याच्यावर यापूर्वी बॅरिएट्रिक (आतड्याशी संबंधित) शस्त्रक्रिया झाली असून त्याला नियमित औषधोपचाराची आवश्यकता आहे. यावर पोलिसांनी न्यायालयाला आवश्यक वैद्यकीय उपचार उपलब्ध करून दिले जात असल्याची माहिती दिली.
फरार आरोपी आणि आर्थिक व्यवहारांवर पोलिसांचे लक्ष
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना 6 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. आता फरार आरोपींचा शोध, आर्थिक व्यवहारांची चौकशी आणि संपूर्ण पेपरफुटी रॅकेटचा पर्दाफाश करण्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. तपासात आणखी महत्त्वाचे खुलासे होण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

