( संगमेश्वर /प्रतिनिधी )
तालुक्यातील विघ्रवली (ता. संगमेश्वर) येथे वैशाख पौर्णिमेनिमित्त भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन समस्त भावकी मुंबई आणि माता रमाई महिला मंडळ विघ्रवली यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आयु. योगेश जाधव (अध्यक्ष, मुंबई) यांनी भूषवले.
कार्यक्रमाची सुरुवात पंचशील व निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करून झाली. यानंतर ध्वजस्तंभास मान्यवरांच्या हस्ते मानवंदना देण्यात आली. संबोधी बुद्ध विहारात तथागत बुद्धांच्या मूर्तीस पुष्प अर्पण करण्यात आले. तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन आणि सूत्रपठण करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ सभासद आयु. रामचंद्र भागुराम जाधव, आयुनी. उत्तमा धोंडीराम गमरे आणि माता रमाई महिला मंडळ विघ्रवली यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात दीक्षा जाधव, सुप्रिया जाधव, विनया जाधव, विजया जाधव, पुनम गमरे, प्रज्ञा गमरे, सांची गमरे, विनोद जाधव, शैलेंद्र जाधव, जितेंद्र कांबळे, विकास गमरे, संतोष जाधव, अनिल गमरे, निलेश गमरे, राहुल गमरे, रमेश जाधव, शंकर गमरे, शरद गमरे, पार्थ कांबळे व नील कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आयु. विजय जाधव (बौद्धाचार्य व माजी श्रामणेर, केंद्रीय शिक्षक) यांनी बौद्ध धम्माच्या तत्वज्ञानावर सखोल मार्गदर्शन केले. जयंतीनिमित्त तथागत बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. सुरेंद्र गमरे यांनी केले.