(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील श्री तू. ग. गांधी विद्यालयात शिक्षक श्री. विजय वामनराव सावंत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात व भावनिक वातावरणात पार पडले.
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन, स्वागतगीत आणि सरस्वती पूजनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. सुरेश शिंदे होते. मुख्याध्यापिका सौ. रंजन रेमणे यांनी उपस्थितांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन केले.
यानंतर संस्था अध्यक्ष श्री. कमलाकर पाथरे, सचिव अजय सावंत, तसेच अध्यक्ष सुरेश शिंदे यांनी शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन श्री. विजय सावंत यांचा सन्मान केला.
संस्थेच्या स्थापनेपासून सेवेत असलेले श्री. सावंत यांनी लिपिक, क्रीडा शिक्षक, संस्थेचे सदस्य अशा विविध भूमिका यशस्वीपणे सांभाळल्या. संस्थापक अध्यक्ष कै. वामनराव सावंत यांचे ते चिरंजीव असून लहानपणापासूनच सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्राचे संस्कार त्यांनी जोपासले.
संगमेश्वर तालुक्यातील जमिनीखालील पाणी शोधण्याची त्यांची विलक्षण नैसर्गिक क्षमता अनेकांच्या उपयोगी आली. बोअरवेल आणि विहिरींसाठी पाणी शोधून अनेक कुटुंबांचे प्रश्न त्यांनी मार्गी लावले.
भजन-कीर्तन, अभंग गाणे, तसेच हार्मोनियम वादन हा त्यांचा आवडता छंद असून शांत, संयमी, सेवाभावी आणि प्रामाणिक व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे. विद्यालयाच्या नावलौकिकात त्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सर्वांनी गौरविले.
मान्यवरांकडून गौरवोद्गार
कमलाकर पाथरे, रवींद्र बांडागळे, हनुमंत कांबळे, मुख्याध्यापिका रंजन रेमणे, मधु आठल्ये, सौ. प्रज्ञा जाधव, अमोल लाड, गमरे सर, मनोज कनावजे, राईन गुरुजी, सौ. सुर्वे (पोलीस पाटील) यांनी आपल्या मनोगतात विजय सावंत यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे पदाधिकारी कमलाकर पाथरे, अजय सावंत, सुरेश शिंदे, पारस गांधी, चंद्रकांत पाथरे, प्रवीण जोयशी,
तसेच पंचक्रोशीतील प्राथमिक, माध्यमिक शाळांचे आणि ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक, राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

