(देवरूख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख शहरात रविवारी भरलेल्या आठवडा बाजारात मच्छी विक्रेत्यावर एका तरुणाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. हल्लेखोराचा वार रोखण्यासाठी विक्रेत्याने हात पुढे केल्याने चाकूचा वार त्याच्या हातावर बसला. प्रसंगावधान राखल्यामुळे विक्रेत्याचा जीव थोडक्यात बचावला. बाजाराच्या दिवशी गजबजलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने व्यापारी, विक्रेते आणि खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाने मच्छी विक्रेत्यावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला. स्वतःचा बचाव करण्यासाठी विक्रेत्याने हात पुढे केल्याने हा वार हातावर झेलला गेला आणि मोठा अनर्थ टळला. मात्र, या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तरुण आणि मच्छी विक्रेता यांच्यात कोणत्या कारणावरून वाद झाला होता, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
देवरूख शहरातील आठवडा बाजारात मोठ्या संख्येने नागरिक खरेदीसाठी येत असतात. यामध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांचाही समावेश असतो. अशा गजबजलेल्या ठिकाणी चाकूने हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील शांततापूर्ण वातावरणात अशा घटना घडणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.
दरम्यान, आठवडा बाजाराच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलिसांनी अधिक बंदोबस्त तैनात करावा, तसेच परिसरात नियमित गस्त वाढवून अशा घटनांना प्रतिबंध करावा, अशी आग्रही मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


