राज्यातील धुळे शहरातील गुलमोहर विश्रामगृहात एका खोलीतून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ मध्ये ही प्रचंड रक्कम लपवून ठेवण्यात आली होती. या धक्कादायक प्रकारामुळे केवळ शहरातच नव्हे तर प्रशासकीय पातळीवरही मोठी खळबळ उडाली आहे.
२२ आमदारांचे शिष्टमंडळ आणि संशयास्पद हालचाली
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी २२ आमदारांचे शिष्टमंडळ धुळ्यात आले होते. याच पार्श्वभूमीवर, जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांनी १५ मेपासून गुलमोहर विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ बुक केली होती.
अनिल गोटे यांना मिळाली माहिती, निषेध आणि आंदोलन
माजी आमदार अनिल गोटे यांना या खोलीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम लपवून ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ खोलीबाहेर निषेध सुरू केला आणि प्रशासनाला घटनास्थळी बोलावले. मात्र, २-३ तासांपर्यंत कोणताही अधिकारी पोहोचला नाही, त्यामुळे संशय आणखी वाढला. शिवसेना कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने अनिल गोटे यांनी धरणे आंदोलन तीव्र केल्यानंतर, अखेर पोलीस आणि महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. यानंतर खोली क्रमांक १०२ चे कुलूप अधिकृतरित्या तोडण्यात आले.
रात्रभर नोटा मोजणीचा थरार
खोली उघडताच पोलिसांनी आत प्रचंड प्रमाणात रोख रक्कम असल्याचे पाहिले. रात्री ११ वाजल्यापासून पहाटे २ वाजेपर्यंत मशीनच्या मदतीने नोटा मोजण्याचे काम सुरू होते. जप्त रकमेचा अधिकृत आकडा अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही, मात्र माजी आमदार अनिल गोटे यांचा दावा होता की, ही रक्कम ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असू शकते. दरम्यान, या खोलीची झडती घेतली असता या खोलीत 1 कोटी 84 लाख 84 हजार रुपये सापडले आहे.
या प्रकरणात विरोधकांकडून राज्य सरकारवर चारही बाजूने टीका होत होती. तर आता या प्रकरणात मोठा निर्णय घेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येणार असल्याची घोषणा विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात एसआयटी (SIT) स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
तर दुसरीकडे या समितीचे प्रमुख आमदार अर्जुन खोतकर यांनी या प्रकरणात विरोधकांकडून सरकारला बदनाम करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे.
जिल्हा धुळे येथे विधीमंडळाची अंदाज समिती दौऱ्यावर असताना विधिमंडळाचे संशयित कक्षअधिकारी श्री किशोर पाटील यांना निलंबित करण्यात आले असून , संपूर्ण प्रकरणाची चौकशी समिती गठित करण्यात येत आहे.
– प्रा राम शिंदे .
सभापती ,
महाराष्ट्र विधानपरिषद.
— Ram Shinde आ प्रा राम शिंदे (@RamShindeMLA) May 22, 2025
अनियमिततेचा आरोप, चौकशीची मागणी
अनिल गोटे यांनी विकासकामांतील गंभीर अनियमितता आणि शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ही रक्कम शासकीय कार्यालयांतून विश्रामगृहात पाठवण्यात आली असावी अशी शक्यता वर्तवली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.