सध्या संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. विजेच्या कडकडाटासह अनेक भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. काही ठिकाणी रस्त्याना नदीचे स्वरूप आलं आहे. जनजीवन विस्कळीत झालं आहे. खरं तर जेव्हा जेव्हा तुफान, जोरदार, मुसळधार पाऊस सुरू होतो तेव्हा तेव्हा एक भीती आपल्या मनात कायम असते, ती म्हणजे वीज कोसळण्याची! राज्यात विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसामुळे २० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, वीज बहुतेक वेळा झाडांवर कोसळते. यामागे कोणती वैज्ञानिक कारणं आहेत आणि त्याचे परिणाम काय होतात, यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे.
झाडांवर वीज का कोसळते?
विजेच्या कडकडाटादरम्यान, ढगांमध्ये तयार होणारी प्रचंड विद्युत ऊर्जा जमिनीकडे मार्ग शोधते. झाडे ही उंच आणि खोलवर रुजलेली असतात, त्यामुळे ती विजेसाठी नैसर्गिक “लाइटनिंग रॉड” (आकर्षक बिंदू) म्हणून कार्य करतात.
वीज ही ढगांमध्ये तयार होणारी स्थिर विद्युत ऊर्जा आहे, जी ढग आणि जमीन यांच्यातील संभाव्य फरकामुळे बाहेर पडते. ढगांच्या खालच्या भागात नकारात्मक भार आणि जमिनीवर किंवा ढगांच्या वरच्या भागात सकारात्मक भार जमा होतो. जेव्हा ढगांमधील नकारात्मक (negative) आणि जमिनीवरील सकारात्मक (positive) भार यांच्यात मोठा फरक निर्माण होतो, तेव्हा वीज ही कमी प्रतिकाराच्या मार्गाने म्हणजेच झाडे, माणसे यांच्या दिशेने जमिनीकडे प्रवास करते.
तज्ज्ञांच्या मते, झाडांच्या टोकाची उंची आणि मुळांमधील ओलावा विजेच्या प्रवाहाला आकर्षित करतो. वीज नेहमी जवळच्या आणि उंच ठिकाणी पडते, कारण ती कमी अंतर आणि कमी प्रतिकाराचा मार्ग शोधते. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे झाडांमध्ये पाणी आणि सॅप (रस) असते, जे विजेचे चांगले वाहक आहे. यामुळे झाडे विजेचा प्रवाह सहजपणे वाहून नेऊ शकतात. वीज कोसळताना सुमारे ३० कोटी व्होल्ट आणि ३०,००० अँपिअर इतकी ऊर्जा निर्माण होते – जी सूर्याच्या पृष्ठभागाच्या तापमानापेक्षा पाचपट अधिक असते. परिणामी, झाडे क्षणार्धात पेटून जळू शकतात, तर त्यांच्या खाली आश्रय घेतलेल्यांचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
वीज कोसळण्याचे प्रमाण वाढतेय का?
क्लायमेट रेझिलियंट ऑब्झर्व्हिंग सिस्टीम्स प्रमोशन कौन्सिलच्या 2021 च्या अहवालानुसार, 2020-21 या कालावधीत भारतात १८.५ दशलक्ष वीज कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या, जे मागील वर्षाच्या तुलनेत ३४% जास्त होते. हवामानातील अनियमितता, वाढते तापमान आणि प्रदूषण हे या वाढीमागील प्रमुख घटक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या अंदाजानुसार, विजेच्या घटनांमध्ये दरवर्षी २०-३५% वाढ होत आहे.
सावधगिरीचा सल्ला आणि उपाययोजना
विशेषतः शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांनी वादळी हवामानात उघड्यावर अथवा झाडाखाली थांबणे टाळावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञ आणि प्रशासनाकडून दिला जात आहे. वीज कोसळण्याचा धोका टाळण्यासाठी सरकारने ‘लाइटनिंग रेझिलियंट इंडिया कॅम्पेन’ अंतर्गत मोबाईल अॅप्स, एसएमएस अलर्ट आणि जनजागृती कार्यक्रम सुरू केले आहेत. तथापि, स्थानिक पातळीवर शाळा आणि ग्रामपंचायतींमध्ये लाइटनिंग अर्लर्ट सिस्टीम, सार्वजनिक ठिकाणी सुरक्षित निवारा केंद्रे, तसेच शिक्षण आणि प्रशिक्षण कार्यक्रम अशा प्रभावी उपाययोजनांची गरज आहे.
वीज चमकत असेल तर अशी घ्या काळजी:
शेतातल्या कामांसाठी बाहेर जाऊ नका
एखाद्या बंदिस्त इमारतीमध्ये आसरा घ्या
वीज चमकत असेल तर झाडाखाली उभे राहू नका
वीज चमकत असताना तुम्ही प्रवास करत असाल तर गाडीच्या काचा बंद करा
सायकल, स्कूटर वरून प्रवास करू नका
वीज चमकत असताना मोबाईल फोनचा वापर करू नका

