(मुंबई)
बुद्धिबळप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणाऱ्या ‘360 ग्लोबल चेस फेस्टिव्हल 2026’ला मुंबईत सुरुवात होत असून देश-विदेशातील नामांकित बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. 10 जून ते 18 जून दरम्यान कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये या भव्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
‘इंडियन चेस स्कूल’ आणि ‘360 वन’च्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत ग्रँडमास्टर्सपासून ते युवा खेळाडूंपर्यंत अनेकांना आपलं कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंच्या सहभागामुळे यंदाच्या स्पर्धेबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
भारतात बुद्धिबळाची गुणवत्ता अफाट; पण संधींचा अभाव
स्पर्धेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात आघाडीच्या ग्रँडमास्टर्सनी भारतातील बुद्धिबळपटूंना अधिक संधी उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. भारताचा अव्वल मानांकित खेळाडू पी. इनियान म्हणाला, “देशातील लहान मुलांमध्ये बुद्धिबळाची मोठी गुणवत्ता दडलेली आहे. मात्र त्यांना योग्य व्यासपीठ आणि संधी मिळत नाहीत. शालेय स्तरावर बुद्धिबळाचा अधिक प्रचार आणि प्रसार होणं आवश्यक आहे.”
अर्जुन पुरस्कार विजेते प्रवीण ठिपसे यांनीही पालकांना महत्त्वाचा सल्ला दिला. “अभ्यासाच्या वाढत्या दडपणामुळे मुलांना खेळासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. डी. गुकेश किंवा आर. प्रज्ञानंद यांच्यासारखे खेळाडू घडवायचे असतील, तर मुलांना आवश्यक संधी आणि पाठबळ देणं गरजेचं आहे,” असं त्यांनी सांगितलं.
विक्रमी बक्षीस रक्कम; ज्युनिअर गटासाठीही मोठं आकर्षण
यंदाच्या स्पर्धेचं सर्वात मोठं आकर्षण म्हणजे जाहीर करण्यात आलेली विक्रमी बक्षीस रक्कम. ग्रँडमास्टर गटासाठी 25 लाख रुपये, तर ज्युनिअर चॅम्पियनशिपसाठी 15 लाख रुपयांची बक्षिसं ठेवण्यात आली आहेत. आयोजक ओरियन प्रो सोल्युशन्सच्या माहितीनुसार, 13 वर्षांखालील मुलांसाठी जाहीर करण्यात आलेली ही बक्षीस रक्कम जगातील सर्वाधिक असल्याचा दावा करण्यात आला आहे.
मास्टर्स गटात आंतरराष्ट्रीय दिग्गजांचा सहभाग
स्पर्धेच्या ‘अ’ गटात 58 अव्वल मानांकित खेळाडू सहभागी होणार आहेत. यात भारताचे ग्रँडमास्टर पी. इनियान, संकल्प गुप्ता, अभिजित गुप्ता आणि संदिपन चंदा यांच्यासह जॉर्जियाचे लुका पैचाझे आणि बेलारूसचे मिहाईल निकीटेन्को यांचा समावेश आहे. या गटासाठी तब्बल 35 लाख रुपयांची बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे. भारतासह बेलारूस, इजिप्त, रशिया, श्रीलंका, उझबेकिस्तान, जॉर्जिया, युक्रेन, स्कॉटलंड, व्हिएतनाम, कॅनडा, अमेरिका, कोस्टा रिका आणि क्युबा येथील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
‘ब’ गटात 225 खेळाडू; विजेत्याला थेट मास्टर्स प्रवेश
स्पर्धेच्या खुल्या ‘ब’ गटात एकूण 225 खेळाडू सहभागी झाले आहेत. 9 फेऱ्यांनंतर या गटातील विजेत्याला 2027 मधील मास्टर्स स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळणार आहे. या गटासाठीही 15 लाख रुपयांची आकर्षक बक्षीस रक्कम ठेवण्यात आली आहे.
ज्युनिअर गटातून घडले अनेक स्टार खेळाडू
‘क’ गटात यंदा 125 ज्युनिअर खेळाडू सहभागी होत असून अमेरिका आणि झाम्बियामधील 11 वर्षीय युवा बुद्धिबळपटूंचाही यात समावेश आहे. भविष्यातील ग्रँडमास्टर्स घडवणारा गट म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे, याच गटातून खेळत जागतिक विजेता डी. गुकेश यानं आपल्या प्रतिभेची पहिली झलक दाखवली होती. दिव्या देशमुख, प्रणव व्यंकटेश यांसारख्या अनेक नामांकित खेळाडूंनीही या गटात विजेतेपद पटकावलं आहे. यंदा या गटासाठी 10 लाख रुपयांची उत्तेजनार्थ बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे.
स्पर्धेचा गौरवशाली इतिहास
2016 ते 2020 या कालावधीत भारतातील अनेक अव्वल बुद्धिबळपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. सध्याचा विश्वविजेता डी. गुकेश याने 2018 मध्ये ही स्पर्धा जिंकली होती. अर्जुन एरिगाईसी, आदित्य मित्तल, लिओन ल्यूक मेंडोन्का आणि दिव्या देशमुख यांसारख्या खेळाडूंनीही या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
यामुळे यंदाची स्पर्धा बुद्धिबळप्रेमींसाठी मोठं आकर्षण ठरत असून भविष्यातील एखादा नवा ग्रँडमास्टर याच स्पर्धेतून पुढे येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

