( शिर्डी )
पक्षातून बाहेर पडलेल्या खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी शिर्डी येथे झालेल्या जाहीर सभेत भाजप, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर जोरदार टीका केली. 2029 च्या राजकीय समीकरणांचा उल्लेख करत त्यांनी भाजपमध्ये पंतप्रधानपदाच्या संभाव्य शर्यतीवरून अंतर्गत राजकारण सुरू असल्याचा दावा केला.
उद्धव ठाकरे म्हणाले, “प्रत्येक गोष्टीचा शेवट असतो. 2029 मध्ये देशाच्या नेतृत्वाबाबत भाजपमध्ये आतापासूनच चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अनेकांची नावे चर्चेत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे.” यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप करत, “अमित शाह यांनी महाराष्ट्रातील शिंदे गटाच्या नेतृत्वाला देवेंद्र फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या गुंतवून ठेवण्याची सुपारी दिली आहे,” असा दावा केला.
‘भाजपापेक्षा शिंदे सेना मोठी झाली’
2019 च्या लोकसभा निवडणुकीचा संदर्भ देत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली. ते म्हणाले, “2019 मध्ये शिवसेनेचे 18 आणि भाजपाचे 23 खासदार निवडून आले होते. मात्र नंतर पक्षफुटीनंतर शिवसेनेतील अनेक खासदार शिंदे गटात गेले. जर खासदार फोडायचेच होते, तर त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही? दुसऱ्याच पक्षाची ताकद वाढवण्याचे काम करण्यात आले. आज महाराष्ट्रात भाजपापेक्षा शिंदे गट अधिक मोठा झाला आहे. उद्या पंतप्रधान निवडीची वेळ आली तर ही शहा-सेना कोणाला पाठिंबा देणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांनी पुढे दावा केला की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा निवडणूक लढवली आणि पक्षाच्या जागा कमी झाल्या. त्यामुळे त्यांना गप्प बसवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाऊसाहेब वाकचौरेंवर उपरोधिक टीका
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावरही उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली. “ते म्हणतात, उद्धव ठाकरेंबद्दल बोललो तर लोक जोड्याने मारतील. मला देवमाणूस म्हणायचे आणि लक्ष मात्र नैवेद्याकडे ठेवायचे. साईबाबांच्या दर्शनाला गेल्यावर भक्तांचे लक्ष आशीर्वादाकडे असते, पण हे ‘खाऊसाहेब’ फक्त नैवेद्य, म्हणजे सत्ता आणि पदांकडेच पाहत होते,” असा टोला त्यांनी लगावला. सभेच्या सुरुवातीलाच कार्यकर्त्यांना उद्देशून त्यांनी, “आपला खासदार पळालाय, सापडला तर सोडू नका,” असे वक्तव्यही केले.
“ही माझीच चूक आहे. या खासदारांविषयीची वस्तुस्थिती मला यापूर्वी माहीत नव्हती. 2014 पासूनच त्यांच्या राजकीय हालचाली सुरू होत्या. मात्र त्यांना निवडून देणारा सामान्य शिवसैनिक आणि शेतकरी आजही आमच्यासोबत ठामपणे उभा आहे,” असे त्यांनी सांगितले.
‘मराठीचा वाक्प्रचार समजून घ्या’
दोन दिवसांपूर्वी केलेल्या “देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटले जात आहेत” या वक्तव्याचा पुनरुच्चार करत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या प्रतिक्रियेवरही भाष्य केले. “मुख्यमंत्री म्हणाले की मला पंखच नाहीत, मग ते छाटणार कसे? अहो, हा मराठीतील वाक्प्रचार आहे. विधानसभा अध्यक्षांकडून तरी मराठी शिकून घ्या,” असा टोला त्यांनी लगावला.

