(देवरुख / प्रतिनिधी )
देवरुख येथील प्रसिद्ध कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यात रविवारी प्रतिपदेपासून गणेशोत्सवास प्रारंभ झाला आहे. प्रत्येक गणपतीची एक गोष्ट असते. हा गणपती घोड्यावर आरूढ असतो. वाजतगाजत या मूर्तीचे आगमन होते. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख येथील हा गणपती मानाचा समजला जातो. आज शनिवार पासूनच चौसोपी वाड्यात सुखकर्ताचे सूर घुमणार आहेत. येथील आरत्यांसाठी देवरुख परिसरातील अनेक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित असतात.
देवरुखला वरच्या आळीत जोशी कुटुंबियांचा चौसोपी वाडा आहे. त्या घराण्याचे मूळ पुरुष बाबा जोशी हे गणेशभक्त होते. ते मोरगावला मोरेश्वराच्या सेवेत होते. एके दिवशी त्यांना व्याधी निर्माण झाली. काही केल्या निराकरण होईना. तेव्हा मोरेश्वराने स्वप्नात दृष्टांत देऊन मंदिरामागे विहीरीजवळ खणण्यास सांगितले. तेव्हा पेटीत पूजलेली चांदीची गणेशमूर्ती सापडली. जोशीबुवांना आनंद झाला. काही दिवसांत व्याधीही दूर झाली. तेव्हा गणेशाने दृष्टांत देऊन ” आपल्या गावी मूर्ती घेऊन जा आणि उत्सव सुरु कर” असे सांगितले. जोशी कुटुंबियांनी त्याप्रमाणे केले आणि या उत्सवाला सुरवात झाली.

ही उजव्या सोंडेची मूर्ती चांदीची असून चार इंचाची आहे. चौसोपी वाड्यातील देवघरात ती वर्षभर बघता येते. मूर्ती सापडली तो दिवस होता भाद्रपद शुध्द प्रतिपदा. त्यामुळे चतुर्थी ऐवजी प्रतिपदेला या उत्सवमूर्तीचे आगमन होते. परंपरेप्रमाणे हा गणपती अश्वारुढ असतो. लाकडी अश्वावर हाताने ही मातीची मूर्ती तयार केली जाते. सोबत रिध्दीसिध्दी आणि भालदार-चोपदार यांच्या लाकडी मूर्ती असतात. प्रतिपदेला सकाळी लवकर श्रीकांत जोशी ( मोरया जोशी , मूळ घर ) यांच्या गणपतीचे आगमन होऊन प्राणप्रतिष्ठा होते आणि मग चौसोपीच्या गणपतीची मिरवणूक निघते. त्यामुळे भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला देवरुखला दोन गणपतींची प्रतिष्ठापना होते. अगदी साध्या कोकणी पध्दतीने डोक्यावरुन या मूर्ती आणल्या जातात. या उत्सवाला ३७५ वर्ष होऊन गेली. पेशवाई काळापासून हा उत्सव आहे. आजही हौशीने अनेक लोक या उत्सवाला येतात. या गणपतीच्या आगमनाने खऱ्या अर्थाने कोकणात गणेशोत्सवाची सुरुवात होते .
रविवारी भाद्रपद प्रतिपदेला देवरुख येथील कै. पंताभाऊ जोशी यांच्या चौसोपी वाड्यातील मानाच्या गणेशमूर्तीचे वाजत गाजत आगमन झाले. देवरुखवासीय आजपासून सुरु होणाऱ्या या गणेशोत्सवात आरत्या आणि अन्य कार्यक्रमात मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. गेली अनेक वर्षे प्रतिपदेच्या उत्सावाची ही परंपरा उत्साहात सुरु आहे.

