(संगमेश्वर / प्रतिनिधी)
तालुक्यातील ऐतिहासिक भैरवगड या गडाचा इतिहास प्रथमच दस्तऐवजीकरणाच्या माध्यमातून लोकांसमोर आणणाऱ्या ‘भैरवगड इतिहास’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दिनांक १० मे रोजी रातांबी गावात अत्यंत उत्साही आणि कौटुंबिक वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रसिद्ध उद्योजक सूर्यकांत साळुंके होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून सुरेश भायजे यांची उपस्थिती होती. पुस्तकाचे प्रकाशन ‘महालक्ष्मी टाईम्स’चे संपादक फिरोज शेख यांच्या हस्ते करण्यात आले.
सचिन पाटोळे लिखित या पुस्तकाच्या निमित्ताने भैरवगडाच्या इतिहासाचा अभ्यासपूर्वक शोध घेतला गेला आहे. लेखकाने सांगितल्याप्रमाणे, भैरवगड हा रत्नागिरी जिल्ह्यात असूनसुद्धा अनेक ठिकाणी तो चुकीच्या नोंदींमुळे सातारा जिल्ह्यात दर्शवला जातो. या गडाचा योग्य इतिहास, वास्तुरचना, स्थानिक लोकजीवन आणि परिसराचे सांस्कृतिक महत्त्व आजवर दुर्लक्षित राहिले होते. हीच पोकळी भरून काढण्याचा निर्धार पाटोळे यांनी केला.
लेखकाने भैरवगड आणि त्याच्या सभोवतालच्या सात गावांमधील वास्तव्याद्वारे माहिती संकलन केले. ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून, कालसागरात हरवलेल्या आठवणी आणि पारंपरिक गोष्टींचे लेखबद्ध स्वरूपात जतन करण्याचा प्रयत्न या पुस्तकात झाला आहे.
या ग्रंथात भैरवनाथ मंदिर, कंधार डोह, चांदोली अभयारण्य, आणि इतर ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचे सखोल वर्णन आहे. पर्यटकांनी फक्त निसर्ग सौंदर्यच नव्हे, तर या भूमीचा इतिहासही जाणावा, ही लेखकाची मनीषा आहे.
या कार्यक्रमास अनेक मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये संतोष थेराडे, नितीन लोकम, दत्ताराम लांबे, लतेश म्हसकर, शांताराम निकम, राजेंद्र मेणे, कृष्णा मेणे, नितीन मेणे, पराग कदम, संजय पाटोळे, तसेच माजी सरपंच शमिका पाटोळे यांच्यासह प्रशांत शिर्के, विरेश निकम, सुनील भुवड, अंकुश राणे, संतोष राणे, संदीप पाटोळे, शैलेश दळवी, राकेश शिगवण, समीर काजवे यांचा समावेश होता.