(रत्नागिरी /प्रतिनिधी)
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या सभोवतालच्या सुशोभीकरणाची, संरक्षक ओट्याची आणि कठड्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकारामुळे आंबेडकरी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचे नमूद करत, पुतळा परिसराची तातडीने दुरुस्ती करावी आणि तोडफोडीची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या रत्नागिरी तालुका शाखेने केली आहे. यासंदर्भात नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा हे आंबेडकरी समाजासह समस्त अनुयायांचे श्रद्धास्थान आहे. अशा महत्त्वपूर्ण ठिकाणाच्या परिसरातील सुशोभीकरणाची झालेली दुरवस्था आणि संरक्षक व्यवस्थेची हानी हा गंभीर विषय असल्याचे निवेदनात म्हटले आहे. ही तोडफोड अपघातामुळे झाली आहे की कोणीतरी जाणीवपूर्वक केली आहे, याबाबत शंका उपस्थित करण्यात आली असून, वस्तुस्थिती स्पष्ट होण्यासाठी सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर परिषदेने संबंधित परिसराची तातडीने पाहणी करून सुशोभीकरणाची दुरुस्ती करावी, तसेच तोडफोडीस जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटवून त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करावी, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीने मांडली आहे. याशिवाय, भविष्यात अशा प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पुतळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत आणि मजबूत संरक्षक कठड्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांवर आठ दिवसांच्या आत कार्यवाही न झाल्यास वंचित बहुजन आघाडी, रत्नागिरी तालुका शाखेच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. त्यामुळे नगर परिषद प्रशासन या प्रकरणाची किती गांभीर्याने दखल घेते आणि पुतळा परिसराच्या दुरुस्तीसाठी कोणती पावले उचलते, याकडे लक्ष लागले आहे.


