(लांजा)
मुंबई-गोवा महामार्गावर देवधे येथील बसथांब्याजवळ आज (शनिवारी, १७ मे) सायंकाळी ४.३० वाजता ट्रक आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात मोटरसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघातास ट्रक चालकाची निष्काळजीपणा कारणीभूत असल्याची प्राथमिक माहिती आहे.
मृत व्यक्तीची ओळख रवींद्र रघुनाथ सुपल (वय ५५, रा. सुपलवाडी, नाचणे, रत्नागिरी) अशी झाली आहे. रवींद्र सुपल हे सेंट्रिंगचे काम करत असून सध्या लांजा तालुक्यातील कुंभारवाडा येथील दसुरकर चाळीत पत्नीसोबत राहत होते. त्यांची मुले मुंबईत वास्तव्यास आहेत. रोज सकाळी रत्नागिरी येथे कामासाठी जाऊन संध्याकाळी लांजाला परत येण्याची त्यांची दिनचर्या होती.
दरम्यान, आज सायंकाळी काम आटोपून ते आपल्या मोटरसायकल (एमएच ०८ एस ९७५५) वरून रत्नागिरीहून लांजाकडे परत येत असताना, सापुचेतळे येथून चिरे घेऊन कराडकडे जाणाऱ्या ट्रक (एमएच ०९ ईएम ७८९६) ने देवधे येथे रॉंग साईडने वळण घेतले. त्यामुळे समोरून येणारे रवींद्र सुपल ट्रकच्या पाठीमागील चाकाखाली सापडले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
ट्रक चालकाचे नाव विजय आत्माराम काळोखे (वय ४२, रा. कराड) असे असून, पोलिसांनी पंचनामा करून चालकाविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे सुपल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

