(लांजा)
तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन परिसरात एका रिक्षा व्यावसायिकाने आपल्या सहकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचा राग मनात धरून तब्बल १० रिक्षा व्यावसायिकांनी त्याला जमिनीवर पाडून बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात दहाही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुरेंद्र सुभाष खामकर (वय ४२, रा. विलवडे, कॉड खामकरवाडी) यांनी याबाबतची तक्रार लांजा पोलीस ठाण्यात दिली आहे. विलवडे रेल्वे स्टेशन परिसरात अनेक रिक्षाचालक व्यवसाय करतात. याच ठिकाणी सुरेंद्र खामकरदेखील स्वतःची रिक्षा (क्र. एमएच ०८ ए क्यू ८९११) घेऊन व्यवसाय करत होते. मात्र, ते स्थानिक रिक्षा संघटनेचे सदस्य नसल्याने त्यांच्यात आणि संघटनेतील सदस्यांमध्ये याआधीपासूनच वादाचे वातावरण होते.
दरम्यान, ४ मे रोजी सुरेंद्र खामकर यांनी रिक्षा व्यावसायिक विनायक रामदेव खामकर (रा. आरगाव) यांच्या विरोधात लांजा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याचा राग मनात ठेवून ५ मे रोजी दुपारी सुरेंद्र खामकर हे रिक्षा थांबवून उभे असताना, विनायक खामकरसह अन्य नऊ जणांनी एकत्र येऊन त्यांना शिवीगाळ करत जमिनीवर पाडले व हाताने, लाथा-बुक्क्यांनी जबर मारहाण केली. त्याचबरोबर, “पुढच्या वेळी रिक्षा लावलीस, तर अजून वाईट अवस्था करू” अशी धमकी देत त्यांचा मोबाईल देखील फोडण्यात आला.
या प्रकरणी विनायक रामदेव खामकर, प्रदीप शांताराम खामकर, मनोहर जनार्दन खामकर, सूर्यकांत तुकाराम कानसे (तिघेही रा. विलवडे), विजय जाधव (रा. वाडगाव), विनोद गोपीनाथ मांडवकर, प्रतीक प्रकाश मांडवकर (दोघे रा. वाघणगाव), दीपक तुकाराम तोरस्कर (रा. रिंगणे), उमेश वामन खामकर (रा. आरगाव) आणि सुनील अनंत शिगम (रा. व्हेळ) या दहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १८९(२), १९१(२), १९०, ११५(२), ३५२, २५१(२), ३२४ (४) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव करीत आहेत.