( कोल्हापूर )
मित्राकडून होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून कोल्हापूरमधील आर. के. नगर परिसरात एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली. आकाश शांताराम बोराडे (वय २३) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना आकाशच्या खोलीतून चार पानी सुसाइड नोट सापडली असून, या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आकाश बोराडे गेल्या तीन वर्षांपासून आपल्या आई-वडिलांसह आर. के. नगर सोसायटीत भाड्याने राहत होता. तो कोल्हापूरच्या के. आय. टी. कॉलेजमध्ये एमबीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता, आणि नुकतीच त्याने परीक्षा दिली होती. कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये एका मॉलमध्ये व्यवस्थापक पदासाठी त्याची निवडही झाली होती.
मात्र, गेल्या काही दिवसांपासून तो गंभीर तणावात होता. नातेवाइकांनी विचारले असता त्याने मित्राकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितले होते. या त्रासामुळे वैतागून त्याने गुरुवारी रात्री राहत्या घरातील बेडरूममध्ये पंख्याला दोरी लावून गळफास घेतला. त्याला त्रास देणारा मित्र कोण आणि नेमकं कशामुळे हा त्रास दिला जात होता, याचा तपास पोलीस करत आहेत. सुसाइड नोटमधील मजकुराचा सखोल तपास करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी आकाशने आपल्या हस्ताक्षरातील चार पानी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही नोट पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी ताब्यात घेतली आहे. उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, तो धाराशिव जिल्ह्याकडे रवाना करण्यात आला आहे. दरम्यान नातेवाईक आज (शनिवारी) कोल्हापुरात परत येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर सुसाईड नोटच्या तपशिलाच्या आधारे संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल, असे पोलीस निरीक्षक शिंदे यांनी स्पष्ट केले.