(खेड)
भडगाव खोंडे (ता. चाळीसगाव) येथील ज्ञानदीप विद्या संकुलाचा च् माजी विद्यार्थी डॉ. नुपूर निनाद खातू यांनी जागतिक स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांची निवड फ्रान्समधील नॅशनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च (CNRS) या आघाडीच्या संशोधन संस्थेत पोस्ट डॉक्टरेट संशोधक म्हणून झाली आहे. ही संस्था इलेक्ट्रॉनिक उपकरणे, नॅनोमटेरियल्स, अल्ट्रा फास्ट लेझर, मॅग्नेटिजम आणि वायरलेस कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये संशोधन करते.
डॉ. नुपूर खातू यांनी शिक्षणाची पायाभरणी ज्ञानदीप विद्या संकुलातच केली. नर्सरीपासून ते बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी याच संस्थेत पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी आयसर, भोपाळ येथून भौतिकशास्त्र विषयात मास्टर ऑफ सायन्स (M.Sc.) पदवी प्राप्त केली. पुढे त्यांनी इटलीतील व्हेनिस विद्यापीठामधून नॅनोमटेरियल्स या विषयात पीएच.डी. पूर्ण केली. अभ्यासक्रमादरम्यान त्यांना जर्मन सरकारकडून फेलोशिप मिळाली होती.
सध्या त्यांची निवड फ्रान्स सरकारच्या नॅनोटेक्नॉलॉजी क्षेत्रातील प्रमुख संशोधन संस्थेत झाली आहे. ही एक मोठी मानाची बाब असून, त्यांच्या या यशामुळे ज्ञानदीप परिवाराला अभिमान वाटत आहे. ज्ञानदीप विद्या संकुलाच्या वतीने डॉ. नुपूर निनाद खातू यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या जात आहेत.