(खेड)
लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमुळे पीफास रसायनांपासून निर्माण होणाऱ्या गंभीर आरोग्य व पर्यावरणीय धोक्यांविरोधात आज (गुरुवारी) सकाळी संतापाचा उद्रेक पाहायला मिळाला. “बंद करा! बंद करा! लक्ष्मी ऑरगॅनिक बंद करा”, “कोण म्हणतंय होणार नाही? बंद केल्याशिवाय राहणार नाही” अशा जोरदार घोषणांनी संपूर्ण औद्योगिक परिसर दणाणून गेला.
लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीच्या वतीने सकाळी ११ वाजता भव्य व ऐतिहासिक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात स्थानिक नागरिक, पर्यावरण कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चाचे नेतृत्व माजी खासदार हुसेन दलवाई आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सोनलक्ष्मी घाग यांनी केले.
मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.
महामार्गापासून कंपनीच्या मुख्य गेटपर्यंत मोर्चेकऱ्यांनी घोषणाबाजी करत आपला तीव्र निषेध नोंदवला. मोर्चा कंपनीच्या गेटजवळ पोहोचताच पोलिसांनी तो अडवून संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला कंपनी प्रशासनाशी चर्चा करण्याची परवानगी दिली.
शिष्टमंडळाने कंपनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून पीफास रसायनांमुळे होणारे पाणी प्रदूषण, आरोग्यावर होणारे परिणाम आणि पर्यावरणीय नुकसान याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. मात्र चर्चेनंतर बाहेर आल्यानंतर शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली. कंपनी प्रशासनाकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, प्रश्नांना उडवा-उडवीची उत्तरे देण्यात आली आणि विशेष म्हणजे कंपनीचा एकही वरिष्ठ अधिकारी चर्चेसाठी उपस्थित नव्हता, असा आरोप करण्यात आला.
याशिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारीही संपूर्ण चर्चेदरम्यान अनुपस्थित राहिल्याने आंदोलनकर्त्यांनी संताप व्यक्त केला. प्रशासनाला कोकणवासीयांच्या आरोग्याची, पिण्याच्या पाण्याची आणि पर्यावरणाची कोणतीही काळजी नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
नुकतेच पालकमंत्री उदय सामंत यांनी ‘कोकणातील निसर्गसौंदर्याला हानी पोहोचवणारे प्रकल्प चालू दिले जाणार नाहीत’ असे वक्तव्य केले असताना, कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनुपस्थिती अधिकच धक्कादायक असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
मोर्चा शांततेत पार पडला असला, तरी नागरिकांचा रोष आणि चिंता स्पष्टपणे जाणवत होती. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा लक्ष्मी ऑरगॅनिक पीफास विरोधी संघर्ष समितीने दिला आहे.

