(चिपळूण/ प्रतिनिधी)
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीत कार्यरत असलेली लक्ष्मी ऑरगॅनिक (पीफास) कंपनी बंद होईपर्यंत संघर्ष थांबवायचा नाही, असा ठाम निर्धार शहरातील सावकर सभागृहात झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत व्यक्त करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर कंपनीविरोधात ८ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता कंपनीच्या मुख्य गेटवर तीव्र आंदोलन छेडण्याची जोरदार तयारी करण्यात आली असून, बहादूरशेखनाका येथून रॅलीला सुरुवात होणार आहे.
बैठकीत बोलताना वक्त्यांनी गेल्या काही वर्षांपासून कोकण विभागात रासायनिक उद्योगांमुळे गंभीर वायू व जलप्रदूषण वाढल्याकडे लक्ष वेधले. एमआयडीसी परिसरातील नागरिकांना श्वसनविकार, कर्करोग तसेच अन्य दुर्धर आजारांचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले. विशेषतः इटलीमध्ये प्रदूषणामुळे हजारो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेली आणि साडेतीन लाखांहून अधिक लोकांना विविध आजारांनी ग्रासलेली मिटेनी कंपनी सध्या लक्ष्मी ऑरगॅनिक केमिकल्स या नावाने लोटे परशुराम येथे कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला. या कंपनीमुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे गंभीररीत्या बाधित होण्याची शक्यता असल्याने ही कंपनी तातडीने बंद करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या “जीवघेण्या” कंपनीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ८ जानेवारी रोजी पुकारलेले आंदोलन पूर्ण ताकदीने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, केवळ एकदाच नव्हे तर कंपनी कायमस्वरूपी बंद होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. “विषारी कंपनी त्वरीत हटवा”, “जीवसृष्टी वाचवा”, “हा राजकीय नव्हे, मानवतेचा लढा” अशा घोषणांनी सभागृह दणाणून गेले.
मार्गदर्शन करताना माजी खासदार हुसेन दलवाई यांनी सांगितले की, हे आंदोलन राजकारणासाठी नसून आपल्या जीवांचे, आरोग्याचे आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी आहे. त्यामुळे या लढ्यात आमदार भास्कर जाधव, माजी आमदार, पर्यावरणवादी उल्का महाजन, डॉ. विनय नातू, डॉ. मंगेश सावंत, सत्यजित सावंत यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनीही या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी संघर्ष समितीचे अशोक जाधव, उदय घाग, सुमती जांभेकर, भरत लब्धे, राजन इंदूलकर, मल्हार इंदूलकर, पत्रकार सतीश कदम, ॲड. संकेत साळवी, सुबोध सावंतदेसाई, तुळशीराम पवार, निलेश भोसले, इब्राहिम दलवाई, अजीम सुर्वे, गुलाब राजे, फैसल देसाई, अल्पेश मोरे, शहानवाज शाह, डॉ. मधुकर शिंगे, केशव लांबे, बशीर बेबल, संजय बुरटे, अंकुश काते, चंद्रकांत चाळके, हुसैन ठाकूर, राजेंद्र आंबरे, सजीव ठसाळे, संदीप आंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.

