(खेड)
लोटेमाळ माळवाडी येथील एका भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या ६५ वर्षीय सुरक्षा रक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (४ मे) सकाळी उघडकीस आली. सुधाकर बाळू वास्कर असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते लोटे एमआयडीसीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होते.
वास्कर हे मूळचे चिपळूण तालुक्यातील टेरव सुतारवाडी येथील रहिवासी होते. कामानिमित्त ते लोटेमाळ माळवाडी येथे एका भाड्याच्या खोलीत एकटेच राहत होते. त्यांना दारूचे व्यसन असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे.
शनिवारी सकाळी त्यांची खोली उघडून पाहिली असता, त्यांनी छताच्या लाकडी भालाला नायलॉनच्या साडीने गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खेड ग्रामीण रुग्णालयात पाठवला.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी प्राथमिक अंदाजानुसार दारूच्या व्यसनामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.