(पुणे)
पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे खुर्द गावातील १५ वर्षीय अंकिता कडाळे हि विद्यालयात पहिली आली आहे. तिने दहावीच्या परीक्षेत ७८.४०% गुण मिळवत उल्लेखनीय यश मिळवले, मात्र दुर्दैवाने तिचे हे यश पाहण्यासाठी ती हयात नाही. एप्रिल २०२५ मध्ये गावातील चार तरुणांच्या सततच्या छळाला कंटाळून अंकिताने आत्महत्या केली होती. तिच्या घरात आज तिचा निकाल पाहताना आनंद नव्हता, तर अश्रूंनी भरलेले डोळे आणि न्यायाच्या प्रतीक्षेत असलेली एक आई होती.
अंकिता अत्यंत गरीब कुटुंबातून आलेली, हुशार आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणारी मुलगी होती. परंतु विशाल दत्तात्रय गावडे, प्रवीण नामदेव गावडे, शुभम सतीश गावडे आणि सुनील हनुमंत खोमणे या चार आरोपींनी तिचा पाठलाग करणे, धमक्या देणे, शस्त्रे दाखवून घाबरवणे, आणि तिच्यावर दबाव टाकणे असे कृत्य सातत्याने केल्याने ती मानसिकदृष्ट्या खचली. “गावाच्या यात्रेपूर्वी तू माझ्याशी लग्न केले नाहीस तर तुझ्या आई-वडिलांना ठार मारू” अशी धमकी तिला आरोपींनी दिली होती.
एक अतिशय गरीब कुटुंबातील हुशार मुलीला गावगुंडांनी आत्महत्येला भाग पाडले होते. मात्र चार आरोपींपैकी केवळ एका आरोपीला अटक झाली होती. काल दहावीचा निकाल लागला अंकितचा निकाल पाहून तिच्या आईने अक्षरशः हंबरडा फोडला. डॉक्टर बनून लोकांची सेवा करण्याचे तिचे स्वप्न अधुरेच राहिले. उर्वरित आरोपींना अटक व्हावी यासाठी तिचे पालक पोलीस स्टेशनची पायरी झिजवत आहेत. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून उर्वरीत आरोपींना अटक व कठोर कारवाई हीच अंकिताला श्रद्धांजली ठरेल असे तिच्या पालकांनी सांगितले.
मानसिक छळाला कंटाळून अंकिताने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. यानंतर संपूर्ण गावात हळहळ व्यक्त झाली. या दुर्दैवी घटनेमुळे समाजात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, अंकिताच्या यशाने आणि त्यानंतरच्या अन्यायाने एक तीव्र भावनिक अस्वस्थता निर्माण केली आहे. प्रशासनाने तत्काळ चौकशी करून उर्वरित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता सर्वत्र होत आहे.