(पनवेल)
पनवेल जवळील तळोजा परिसरात अंमली पदार्थ विरोधी कक्षाने (ANC) धाडसी कारवाई करत तब्बल १ कोटी २ लाख १९ हजार ५०० रुपयांचे हेरॉईन व अफू जप्त केले आहे. या प्रकरणी पंजाबमधील दोघांना अटक करण्यात आली असून, या ड्रग्ज तस्करीशी संबंधित एका ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.
तळोजा येथील घोट कॅम्प परिसरातील “महावीर मॅजेस्टी” इमारतीत हेरॉईनची विक्री सुरू असल्याची खात्रीलायक माहिती अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार एनडीपीएस कायद्यातील तरतुदींचे पालन करत छापा टाकण्यात आला.
या कारवाईत आरोपी १) सुरींदर गुरुजंत सिंग उर्फ काळु (वय २४) २) मनिंदर गुरुजंत सिंग (वय २७) दोघेही रा. निहालसिंगवाल, जिल्हा मोगा, पंजाब, यांना अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून ११८ ग्रॅम हेरॉईन आणि १४३.६ ग्रॅम अफू असा एकूण १ कोटी २ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी तळोजा पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ७८/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त धर्मपाल बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे आणि त्यांच्या पथकाने केली. तळोजा व परिसरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या व्यवहारांवर पोलिसांनी घेतलेली ही कारवाई महत्त्वाची मानली जात आहे.

