(रत्नागिरी)
ना. उदय सामंत, ना. भरत गोगावले आणि ना. योगेश कदम यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन झालेल्या रत्नागिरी बसस्थानकाचा मुख्य रस्त्याचा परिसर पुन्हा एकदा बकाल दिसू लागला आहे. उद्घाटनावेळी लाखो रुपये खर्चून स्वच्छ, आकर्षक आणि सुंदर बनवलेला परिसर आता हातगाड्या, टपऱ्या आणि अस्तव्यस्त पार्किंग यामुळे भरून गेला आहे.
उद्घाटनाच्या पूर्वसंध्येला संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला होता. नगर परिषदेचे कर्मचारी, नर्सरीतील झाडांची झटपट लागवड, रस्त्यांवर पांढरी रांगोळी आणि आकर्षक सजावट करत बसस्थानक परिसर मंत्र्यांच्या स्वागतासाठी तयार करण्यात आला होता. नागरिकांनीही या बदलाचे कौतुक करत लोकप्रतिनिधींना दाद दिली. मात्र, या सौंदर्याचे आयुष्य अल्पकाळ ठरले. उद्घाटनानंतर अवघ्या काही दिवसांत परिसर पुन्हा हातगाड्या, टपऱ्या, मटका आणि गुटख्याच्या विक्रेत्यांनी व्यापून गेला आहे. इतकेच नाही तर अन्नपदार्थ विक्रेत्यांनीही तळ ठोकले आहेत. अपुऱ्या जागेमुळे एका वृद्धाचा मृत्यू होण्याची दुर्दैवी घटना दुसऱ्याच दिवशी घडली होती. आता रस्ता अरुंद झाल्याने नागरिकांना वाहने पार्क करण्यासाठीही जागा उरलेली नाही.
या टपऱ्यांना कोणाचा ‘आशीर्वाद’ मिळतोय, हा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. उद्घाटनासाठी केलेली सजावट, खर्च आणि लोकप्रतिनिधींचा आभास – हे सर्व नागरिकांच्या अपेक्षांनाच गंड घालणारे ठरत असल्याची भावना आहे.
पुन्हा एकदा या अतिक्रमणांविरुद्ध कारवाई करावी आणि परिसर स्वच्छ व मोकळा ठेवावा, अशी नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे. प्रशासनाने या तक्रारी गांभीर्याने घेऊन त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी होत आहे.